गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या निंबा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत कार्यरत शिक्षक जी.आर. मरसकोल्हे हे शाळेत दारू पिऊन आले. झिंगतच त्यांनी वर्गखोलीत प्रवेश केला. त्यांची अवस्था बघून विद्यार्थी घाबरले. त्यांनी याची माहिती मुख्याध्यापक नंदेश्वर तथा आपल्या पालकांना दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा प्रकार माहित होताच त्यांनी शाळा गाठली. यावेळी शिक्षक मरसकोल्हे हे वर्गखोलीत झोपून होते. त्यांनी वर्गातच लघुशंका केल्याचे निदर्शनास आले. यावेळी शिक्षक तथा कर्मचाऱ्यांनी मद्यपी शिक्षकाला गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, निंबाच्या सरपंच वर्षा पटले, पंचायत समिती सदस्य राकेश पंधरे, बुधराम बिजेवर, पालक, गावकरी यांनी गोरेगाव पोलीस ठाणे गाठून यासंदर्भातील तक्रार नोंदवली. शिक्षकाच्या या प्रतापामुळे गावकरी व पालकांनी तीव्र संताप व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे.

मद्यधुंद शिक्षकाची माहिती मागवली

यासंदर्भात शुक्रवारी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्या मद्यधुंद शिक्षकाची त्या दिवशीची संपूर्ण माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांनी विभागाला पाठवली असून त्या शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई करण्याकरिता अहवाल जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्याकडे पाठवण्यात आला आहे, तेच यावर अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांनी दिली.

कारवाई संदर्भातील प्रकरण प्रलंबित

तीन वर्षांपूर्वी निलंबित शिक्षक मरसकोल्हे यांना दारूचे व्यसन आहे. देवरी पंचायत समितीमध्ये कार्यरत असताना ऑगस्ट २०१९ मध्ये त्यांना निलंबित करण्यात आले होते. शिक्षण आयुक्तांकडे कारवाई संदर्भातील प्रकरण प्रलंबित आहे. तसेच शिक्षक मरसकोल्हे यांच्यावर कारवाईसाठी जून व सप्टेंबर २०२२ मध्ये प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला असल्याचे गोरेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणअधिकारी शिरसाठ यांनी सांगितले.

शिक्षकांची प्रतिमा मलीन

निंबा शाळेतील प्रकार निंदनीय आहे. या प्रकारामुळे शिक्षकांची प्रतिमा मलीन झाली आहे. हा प्रकार कळताच पंचायत समिती येथील कर्मचाऱ्यांना निंबा येथे पाठवून पंचनामा करून शिक्षकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. शिक्षकावर पंचायत समिती स्तरावरून कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवणार असल्याचे गोरेगाव पंचायत समिती सभापती मनोज बोपचे यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher in drunken state fall sleep in classroom sar 75 scsg