यवतमाळ : सध्या शेअर बाजार कोसळले आहे. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणुकीची ही योग्य संधी असल्याचे सांगून ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी सक्रीय झाली आहे. वणी येथील एका शिक्षकाने शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याचा मोहात जवळपास १४ लाख रुपये गमावले. कमी किमतीत शेअर्स मिळवून देण्याचे आमिष दाखवत वणी येथील या शिक्षकास १३ लाख ६७ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घालण्यात आला. किशोर ओंकार चौधरी, रा. गुलमोहर पार्क वणी, असे फसगत झालेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचे नाव आहे.
त्यांनी फसवणूक झाल्याप्रकरणी वणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बार्कलेस सिक्युरिटी कंपनीतील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणातील आरोपी महिलेने किशोर चौधरी यांच्याशी व्हॉट्सॲपवरून चॅटिंग करून ५० टक्के सूट देऊन शेअर मार्केटमधील आयपीओ सबस्क्राइब करून देण्याचे आश्वासन दिले होते.
याकरिता प्रायमरी ट्रेडिंग अकाऊंट काढण्यासाठी एका कंपनीचे मोबाइल ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यावरून चौधरी यांनी संबंधित ऍपद्वारे टप्या-टप्प्याने १३ लाख ६७ हजार रुपये जमा केले. यानंतर या ऍपमध्ये वेळोवेळी चौधरी यांनी जमा केलेली रक्कम दर्शविली जात होती. या रकमेचा वापर करून आरोपींनी करावयास सांगितलेल्या ट्रेडद्वरे चौधरी यांच्या प्रायमरी शेअर मार्केट अकाऊंटमध्ये ४४ लाख ६५ हजार ५७४ रुपयांची रक्कम जमा असल्याचे दिसत होते. त्यानंतर संबंथित ग्रुपच्या महिला ॲडमिनने चौधरी यांना पुन्हा नवीन येऊ घातलेल्या एका कंपनीच्या आयपीओला सबस्क्राइब करण्यास सांगितले. मात्र,चौधरी यांनी आता आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले.
आयपीओचे पैसे न भरल्यास काय होऊ शकते, याविषयी चौधरी यांनी विचारणा केली. तेव्हा आरोपींनी फिर्यादीस काळजी करू नका. तुमच्या खात्यामध्ये जेवढे पैसे आहेत, तेवढ्याच पैशाचे शेअर्स मिळत असल्याचे सांगितले. मात्र ५ मार्च रोजी चौधरी यांच्या ट्रेडिंग अकाऊंटमध्ये एकूण ५९ लाख ६५ हजार रुपयांचे आयपीओ अलॉट झाल्याचा संदेश आला.
तेव्हा चौधरी यांनी आरोपी महिलेला याबाबत सांगितले. आरोपी महिलेने काही तरी करू, असे सांगितले आणि नंतर ६ मार्च रोजी चौधरी यांना उर्वरित १५ लाख रुपये भरणा करण्यास सांगितले. पैसे न भरल्यास आतापर्यंतची जमा असलेली ४४ लाख ६५ हजार ५७४ रुपये कंपनी ब्लॉक करील आणि चौधरी यांना प्रायमरी शेअर मार्केटमधून काळ्या यादीत टाकले जाईल, असा इशारा दिला. त्यामुळे चौधरी यांना हा प्रकार संशयास्पद वाटला. त्यांनी याबाबत वणी पोलिसात तक्रार दिली.
आरोपींनी १८ फेब्रुवारीपासून ६ मार्चपर्यंत चौधरी यांची १३ लाख ६७ हजार ५७४ रुपयांनी ऑनलाइन पद्धतीने फसवणूक केली. चौधरी यांनी या संदर्भात वणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवर तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विनी रायबोले करीत आहेत.