नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे अपात्र शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता देणे आणि शालार्थ ‘आयडी’ तयार करण्याच्या प्रकरणात सदर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री नवी तक्रार करण्यात आली. तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांनी भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील एका शाळेतील दोन शिक्षकांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शिक्षण संस्थाचालक, उपसंचालक आणि उपसंचालक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार करून या नियुक्त्या देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
नवप्रभात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामलाल चौधरी आणि कार्याध्यक्ष हेमंत बांडेबुचे यांनी ही तक्रार दिली. संस्थेचे माजी अध्यक्ष कल्याण डोंगरे, तत्कालीन सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कमल कटारे आणि उपसंचालक जामदार यांच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली. कटारे या नवप्रभात शिक्षण संस्थेंतर्गत संचालित नवप्रभात हायस्कुल, वरठी येथे मुख्याध्यापिका होत्या. शाळा समितिच्या १६ जुलै २०१७च्या ठरावानुसार संस्थेने व शाळा समितीने केवळ ज्ञानेश्वर शहारे, विनोद साखरकर व शोभना ठाकरे यांची उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून नियुक्ती केली व त्या अनुषंगाने त्यांना शिक्षण विभागाने मान्यता प्रदान केली होती. परंतु, तक्रारकर्त्यांनी शिक्षण उपसंचालक, नागपूर यांच्याकडे यासंदर्भात चौकशी केली असता, डोंगरे, मुख्याध्यापिका कटारे यांनी संगनमत करून १६ जुलै २०१७च्या ठरावांमध्ये इशा सदानंद आगाशे व सुरेश चैतराम पटले यांच्या नावाचा समावेश केल्याचे समोर आले.
माहितीच्या अधिकारात प्राप्त माहितीवरून, डोंगरे व कटारे यांनी मूळ ठरावात फेरबदरल करून आगाशे यांची नियुक्ती उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून दाखवून तसा बनावट प्रस्ताव शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग यांच्याकडे दाखल केला. तसेच त्या प्रस्तावासोबत मूळ ठरावातील नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी इशा सदानंद आगाशे, सुरेश चैतराम पटले यांना दाखवून बनावट ठरावाची प्रत सत्यप्रत म्हणून दाखल केली. तसेच त्यासोबत खोटे नियुक्तीपत्र व रुजू अहवाल दर्शवून मंजुरीकरिता शिक्षण उप-संचालक, नागपूर विभाग, नागपूर यांच्याकडे दाखल केला. या प्रस्तावाला तत्कालीन उपसंचालक जामदार यांनी मान्यता देऊन या शिक्षकांची नियुक्ती केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शेखर पाटील नावाचा कर्मचारी यात सहभागी असल्याचा आरोप आहे.