आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीमुळे उघडकीस; तरीही आकस्मिक मृत्यूची नोंद, एमआयडीसी पोलिसांचा अजब कारभार
‘एक पोलीस कर्मचारी आणि प्राध्यापकांच्या त्रासामुळे आपण आत्महत्या करीत आहोत’, असे एका शिक्षकाच्या ‘सुसाईड नोट’मध्ये नमूद असतानाही दीड महिना उलटून गेल्यानंतरही हिंगणा एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
विजय सुखदेव हुमने (४२, रा. प्लॉट क्रमांक ३५, हनुमाननगर, हिंगणा रोड) यांनी ३ डिसेंबर २०१५ ला संध्याकाळी पाचच्या सुमारास बहादुरे ले-आऊट परिसरातील एल.जी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स प्लॉटमधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ते एका खासगी शाळेत शिक्षक होते. हुमने यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढला असता त्यांच्या पॅन्टच्या खिशात एक ‘सुसाईड नोट’ सापडले. त्यामध्ये हुमने यांनी पोलीस शिपाई शरदचंद्र मून आणि गडचिरोली जिल्ह्य़ातील आरमोरी येथील महाविद्यालयात प्राध्यापक असणारे रामटेके यांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असून आपल्या मृत्यूला तेच जबाबदार असल्याचे स्पष्टपणे लिहून ठेवले आहे. या प्रकारानंतरही एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. संबंधितांविरुद्ध कोणतीही कारवाई न करता प्रकरण दडपण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सविता रामटेके यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे आरोपी प्राध्यापक रामटेके हे पोलीस उपनिरीक्षक सविता यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे नातेवाईकाचा तपास नातेवाईकच करीत असल्याने प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. तर दुसरे आरोपी शरदचंद्र मून हे पोलीस कर्मचारी असून सध्या ते नागपूर शहर पोलीस मुख्यालयाशी जुळले आहेत. त्यांची नोकरी लक्ष्मीनगर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात आहे. त्यामुळे मून यांच्याकडूनही तपास यंत्रणेवर दबाव टाकण्यात येत आहे. आरोपींना वाचविण्यासाठी एमआयडीसी पोलीस प्रयत्न करीत असल्याचा आरोप मृत शिक्षकाचे नातेवाईक करीत आहेत. यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक सविता रामटेके यांच्याशी संपर्क केला असता त्या म्हणाल्या, प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृताच्या घरातून कोणत्याही व्यक्तीने तक्रार दिली नाही. त्यामुळे आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला नाही. शिवाय प्रकरणातील आरोपी हा नातेवाईक असल्यामुळे त्या प्रकरणाचा तपास दुसरा नातेवाईक करू शकत नाही, असा कुठला नियम आहे? असा उलट सवाल त्यांनी केला.परंतु मृत शिक्षकाने ‘सुसाईड नोट’ स्पष्टपणे दोन व्यक्तींच्या नावासह ते आपल्या मृत्यूस जबाबदार असल्याचे लिहून ठेवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस दल त्यांच्या कुटुंबीयांकडून तक्रारीची प्रतीक्षा करणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रकरणात लक्ष घालून आरोपींविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी मृताच्या कुटुंबीयांकडून होत आहे.
पोलीस निरीक्षकांकडून तपास अधिकाऱ्यांची ‘री’
या प्रकरणासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हिंगणा एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू भोई यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीही तपास अधिकारी सविता रामटेके यांची ‘री’ ओढली. या प्रकरणाची आपल्याला माहिती नाही. पोलीस निरीक्षकांकडून प्रकरणाची माहिती मिळवून असा प्रकार असेल तर आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात येईल,असे पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे यांनी सांगितले.