वर्धा : कुटुंबाचे रहाटगाडगे कर्त्या पुरुषाच्या कमाईवर चालते. जर तो नोकरीवाला असेल तर मग पगार आवश्यक बाब ठरून जाते. १ तारखेस पगार झाला की करू, असे आश्वासन हमखास पगारदार घरात ऐकायला मिळत असते. म्हणून पगार आवश्यक. माजी मुख्यमंत्री दिवं. विलासराव देशमुख यांचा किस्सा. विकास कामासाठी पैसा वळवीत असताना पगार लांबणार होते. तेव्हा मुख्यमंत्री व हुशार राजकारणी समजल्या जाणाऱ्या देशमुख हसत हसत बोलून गेले होते की विकास थांबविता येतो, पगार नाही.
मात्र आता राज्यभरातील शिक्षक कासावीस झाले आहेत. कारण एप्रिल मध्यावर आला पण पगार झालेले नाही. सर्व शाळांनी महिन्याच्या २२ तारखेस पगार बिले जमा करणे अपेक्षित असते. त्यावर आवश्यक ती कार्यवाही केल्या जाते. मग ही बिले पे युनिटकडून ट्रेझरीकडे पाठविण्यात येतात.
पण ही बिले वेळेत सादर झाली नाही. ट्रेझरीकडे गेली नाहीत. म्हणून पगाराचा खोळंबा. मग शिक्षक संघटना आक्रमक होतात. कारण शिक्षक जाब विचारतात. शिक्षकवर्गास कुटुंब खर्च, घराचे हफ्ते, गाडीचा हफ्ता, मुलांची फी व अन्य तरतुदी पगारातूनच करावी लागते. उशीर झाला की आर्थिक ओढाताण सुरू होते.
त्यातच आता सुट्ट्या सुरू झाल्या. म्हणून सर्व प्रक्रिया लांबणीवर. विदर्भ मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य सतीश जगताप म्हणाले की, साधारणपणे मार्चचा पगार थोडा लांबतोच. पण आता शालार्थ आय डी अद्यावत करण्याचे काम हाती घेण्यात आले. ते प्रलंबित होते. या प्रक्रियेत दोष राहू नये म्हणून अद्यावत करणे अनिवार्य होते. बिले सादर झालीत. निधी पण आला आहे. सुट्ट्या आल्यात. पण पुढील आठवड्यात हातात पगार पडतील, अशी खात्री आहे.