लोकसत्‍ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : केंद्र सरकारच्‍या निर्देशानुसार शाळांमध्‍ये ‘तिथी भोजन’ (स्नेहभोजन) उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी गावातील दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना स्नेहभोजन देण्याकरीता आवाहन करण्यात यावे, असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. यासाठी गावातील दानशूर व्यक्तींचा शोध घेण्‍याची वेळ मुख्‍याध्‍यापक आणि शिक्षकांवर आली आहे.

केंद्र सरकारच्‍या निर्देशानुसार संपूर्ण देशभरात २२ ते २८ जुलै या दरम्यान ‘शिक्षण सप्ताह’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. आठवड्यातील प्रत्येक दिवशी एका विशिष्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. २८ जुलै रोजी समुदाय सहभाग दिवस साजरा करताना तिथी भोजन, विद्यांजली इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

आणखी वाचा-“आमदार महोदय, हे गढूळ पाणी पिऊनच दाखवा,” कार्यकर्ता संतापला; म्हणाला, “…तर लोकं जोडे मारतात,”

समुदाय सहभाग दिवशी स्नेहभोजन उपक्रमाचे आयोजन शाळेने करावे. या उपक्रमांतर्गत पूर्ण जेवण, मिठाई किंवा पूरक पोषक आहार (उदा. मोड आलेली कडधान्ये, शेंगदाणे, सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ते, मनुका, आक्रोड, बेदाणे, फळे, शिजविलेले पदार्थ, मिष्टान्न) इत्यादीचा समावेश असलेले अन्न, आहार विद्यार्थ्यांना देण्यात यावा, असे आदेश देण्‍यात आले आहेत. भोजनात कोणत्या पदार्थाचा समावेश करावा याबाबत संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने व देणाऱ्या व्यक्तीनी परस्पर सहमतीने एकत्रित निर्णय घ्यावा. खाद्य पदार्थ ताजे व पौष्टिक असावे, तांदूळ, गहू, नाचणी, शेवगा शेंग, डाळींसोबत हिरव्या पालेभाज्या प्राधान्याने दिल्या जाव्यात. बाजारातील वेष्टनबध्द पदार्थ (जंक फूड) तसेच उघड्यावरील आणि शिळे अन्नपदार्थ विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नयेत, यासोबतच जंक फूडच्या हानिकारक प्रभावांबद्दल विद्यार्थी आणि पालक तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी.

आणखी वाचा-शरद पवारांवर अमित शहांच्या टिकेने अजितदादा गटाचे आमदार व्यथित!

विद्यार्थी हे देखील त्यांच्या दैनंदिन जीवनात अन्न पदार्थांची नासाडी कमी करुन, हरीतगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी त्यांचे बहुमूल्य योगदान देऊ शकतात, याची जाणीव सर्व विद्यार्थ्यांना करुन देण्यात यावी. खाद्य पदार्थाचे विद्यार्थ्यांना वितरण करताना वितरकाने शाळेत उपस्थित रहावे. तसेच खाद्य पदार्थ विद्यार्थ्यांना शाळेमध्येच व दुपारच्या सुट्टीत तथा शालेय वेळेतच देण्यात यावेत. सदर भोजनातून अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता संबंधित वितरक आणि शाळेने घेणे आवश्यक आहे. आहाराचे वितरणाकरीता आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. समुदाय सहभाग दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करावा, तसेच राबविण्यात आलेल्या सर्व उपक्रमाबाबतची माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर विहित वेळेत अद्यावत करण्‍यात यावी, असे आदेश जिल्हास्तरीय शिक्षण विभागाला राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत.दानशूर व्‍यक्‍ती न मिळाल्‍यास स्‍नेहभोजन खर्चाचा भुर्दंड मुख्‍याध्‍यापक, शिक्षकांवर येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers are looking for donor for students snehbhojan mma 73 mrj