नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्षक संघटना सक्रिय झाल्या आहेत. स्वत:चा उमेदवार लढवायचा की कुणाला पाठिंबा द्यायचा, हे काँग्रेसने अद्यापही जाहीर केलेले नाही. तर भाजपा शिक्षक आघाडी आणि शिक्षक परिषद भाजपकडून उमेदवारीसाठी मागणी करत असले तरी भाजपनेही अद्याप कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे संघटनांनी आपल्या पातळीवर तयारी सुरू केली असली तरी पक्षाकडून हिरवी झेंडी न मिळाल्याने पेच निर्माण झाला आहे.
हेही वाचा >>> नागपूर : खळबळजनक, अज्ञात आरोपींनी चक्क पोलिसांची वाहने जाळली
नागपूर शिक्षक मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकीत भाजपने शिक्षक परिषदेचे उमेदवार आमदर नागो गाणार यांना पाठिंबा देत ही निवडणूक स्वत:च्या अंगावर घेत लढविली. यावेळी भाजपच्या समर्थनाची वाट न पाहता शिक्षक परिषदेने तिसऱ्यांदा गाणार यांची उमेदवारी जाहीर केली. भाजपकडून आज ना उद्या गाणार यांना समर्थन जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पाठिंबा जाहीर होण्यास विलंब होताना दिसल्यामुळे शिक्षक परिषदेचे प्रदेश अध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी ३ ऑक्टोबर रोजी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवत पाठिंबा देण्याची विनंती केली. मात्र, या पत्राला महिना उलटूनही भाजपकडून सकारात्मक पावले उचलली गेली नाहीत.
हेही वाचा >>>नागपूर : पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या
दुसरीकडे नागपूर विभागीय पदवीधर निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानंतर महाविकास आघाडीला बारा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आसलेला शिक्षक मतदारसंघ जिंकण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. असे असतानाही काँग्रेसने अद्यापही उमेदवार किंवा पाठिंबाही जाहीर केला नाही. विशेष म्हणजे, पदवीधर निवडणुकीदरम्यान काँग्रेस आणि शिक्षक भारतीमध्ये छुपी युती झाल्याची माहिती आहे. मात्र, काँग्रेसकडून पाठिंब्याची घोषणा अद्याप नाही. काँग्रेस किंवा महाविकास आघाडीने अद्यापही शिक्षक मतदारसंघासदर्भात कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते डॉ. बबनराव तायवाडे यांच्या निकटवर्ती सुषमा भड यांना कास्ट्राईब महासंघाने शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसमध्ये काय सुरू आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांकडून अद्यापही उमेदवार किंवा पाठिंबा जाहीर न झाल्याने संघटनांमध्ये गोंधळ वाढला आहे.