वर्धा : राजकीय स्थिती स्थिर आहे. यावेळी गंभीर व्हा. निर्णयाप्रत आलो नाही तर पुढे कोणाला दोष देता येणार नाही. हे निवडणुकीचे वर्ष आहे. त्या तोंडावर आल्या की कोणतेच सरकार कोणत्याच घटकास नाराज करीत नाही आणि निवडणुका झाल्यावर पुढे चार वर्ष कुणाला गांभीर्याने घेत नाही. म्हणून १६, १७ जानेवारीला मुंबईत या. राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळा बंद ठेवा व सर्व स्टाफसह मुंबईत दाखल व्हा, अशी हाक अंशतः अनुदानित शाळा संघटनेचे नेते खंडेराव जगदाळे यांनी दिली आहे.
विना अनुदानित शाळांना अनुदान तसेच टप्प्या टप्प्याने मिळणारे अनुदान याबाबत हा लढा आहे. तसेच अनुदानासाठी पटसंख्येचा निकष हा वादाचा मुद्दा आहेच. त्यासाठी संघटनेने निकराचा लढा म्हणून दोन दिवस मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे देण्याचा निर्णय घेतला. मुंबईत याच. त्याशिवाय पर्याय नाही. घराबाहेर पडून मुंबई गाठा. तरच शासन दरबारी हालचाली होतील. मी नाही गेलो तर काय फरक पडणार, असे म्हणू नका.दोन महिने झाले पगार नाही,मग कसा येवू असे बोलू नका.
हेही वाचा…वर्धा : जिल्हा बँकेला दिलासा; राष्ट्रवादीच्या मदतीस भाजप आमदाराची धाव
उदासीनता सोडा. पगार नव्हता तेव्हा पण लढा दिला आहे.कुणीच घरी न थांबता लढ्यात सहभागी व्हा. कारण हे लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वर्ष आहे. म्हणून आचासंहिता लागू होण्यापूर्वी आपल्या बाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणे आवश्यक आहे. दोन दिवस शाळा बंद ठेवून हजारोंच्या संख्येने मुंबई गाठली तर यश आपलेच आहे. झाले तर आत्ताच नाही तर परत पश्र्चाताप करत बसावा लागेल. आपण सुज्ञ आहात, हित लक्षात घेवून घर सोडा, आझाद मैदान वाट बघत आहे, अशी कळकळीची विनंती संघटनेने केली आहे.