वर्धा : मराठा सर्वेक्षण हे अशैक्षणिक काम असल्याचा आक्षेप घेत शिक्षकांनी सर्वेक्षणावर बहिष्कार टाकला आहे. मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षकांना जबाबदारी देण्यात आली आहे. एका शिक्षकास शंभर कुटुंबांचा १८५ प्रश्न असलेला अर्ज सात दिवसांत भरून द्यायचा आहे. शिक्षकांच्या मते एका कुटुंबाचा अर्ज भरण्यासाठी पाउण तासाचा कालावधी लागताे. असे असल्याने शाळेतील अध्यापन बंद करून सर्वेक्षण करावे लागेल. मग शाळा पूर्ण बंद ठेवायच्या काय, असा सवाल शिक्षक तक्रार निवारण समितीने करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घोषित केला.
संघटनेच्या मते दहावीच्या सराव परीक्षा सुरू असून बारावीच्या परीक्षा लवकरच सुरू होतील. बहुतांश शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या तसेच विद्यार्थ्यांची उजळणी घेण्यास व्यस्त आहे. ते सोडून सर्वेक्षणाच्या कामी लागल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. हे सर्वेक्षण २३ ते ३१ जानेवारी दरम्यान पूर्ण करण्याचे निर्देश आहे. याच काळात २६ जानेवारीला गणतंत्र दिनाचा उत्सव साजरा करण्याची जबाबदारी आहे. त्याच्या तयारीत शिक्षक लागले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमाचे पण कामकाज शिक्षक करीत आहे. आता प्राधान्य कशाला द्यायचे, हे स्पष्ट झाले पाहिजे. शिक्षकांची नियुक्ती अध्यापनासाठी झाली आहे. मात्र ते सोडून ईतर अशैक्षणिक कामेच सातत्याने शिक्षकांकडून करून घेतल्या जात आहे. परिणामी मराठी माध्यमांच्या शाळा ओस पडत असल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड रोष आहे. या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणावर बहिष्काराची भूमीका घ्यावी लागत असल्याचे शिक्षक नेते अजय भोयर यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – संमेलनाच्या मंचावर आठ मंत्र्यांची मांदियाळी! राजकीय प्रभाव कमी करण्यात महामंडळही अपयशीं
संघटनेचे पदाधिकारी धनराज कावटे, अनिल टोपले, कुंडलीकर राठोड, मुकेश इंगोले, पुंडलीक नाकतोडे, गणेश मानकर, एस.पी.सावदे, आदी पदाधिकाऱ्यांनी प्रशासनापुढे अडचणी मांडल्या. हे सर्वेक्षण ठराविक मुदतीत करून द्यायचे आहे. मात्र शिक्षकांची अशी भूमिका प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरणार.