हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शैक्षणिक सत्रारंभाच्या या काळात कोणत्याही शहरात गेले की, जागोजागी लागलेले मोठमोठे फलक आपल्या दृष्टीला पडतात. हे फलक कुणा राजकारण्यांचे नाहीत किंवा राजकीय पक्षांचेही नाहीत. शिकवणी वर्गाच्या यशाचा, तसेच आपलीच शाळा अथवा महाविद्यालय कसे श्रेष्ठ, असा दावा सांगणारे हे फलक शिक्षणाच्या बाजाराचे महत्त्व अधोरेखित करत असतात. या फलकांवर गुणवंत विद्यार्थ्यांची जशी छायाचित्रे असतात तशीच शिकवणी वर्गात लोकप्रिय असलेल्या शिक्षकांच्या सुद्धा तसबिरी झळकत असतात. काही शिकवणी वर्ग तर या शिक्षकांच्या नावानेच प्रसिद्ध असतात. प्रत्येक शहरात असा व्यवसाय थाटून बसलेला एखादा लोकप्रिय शिक्षक असतोच व पालकांची गर्दी त्याच्याकडे होत असते. शाळांनी शुल्क वाढवले, गणवेशाची सक्ती केली की, शिक्षणाचा बाजार मांडलाय या संस्थाचालकांनी! अशी ओरड करणारा पालक या शिकवणी वर्गाच्या दारी मात्र निमूटपणे पैशाची थैली घेऊन उभा झालेला आपल्याला दिसतो. गेल्या २० वर्षांत फुललेला व आता पूर्ण बहरात आलेला हा शिकवणी वर्गाचा व्यवसाय आता शिक्षण व्यवस्थेचा एक अविभाज्य घटक होऊन बसला आहे. शिकवणी वर्गात टाकल्याने पाल्याला खरोखरच यश मिळते का?, या वर्गाच्या यशाचे प्रमाण किती?, यश मोठे की जाहिरातबाजी मोठी?, यासारख्या प्रश्नांचा विचार न करता पालक या वर्गाच्या मागे धावताना आज दिसतात. इतर सर्व मुले या वर्गात जातात, मग माझा मुलगा का नाही?, या स्पर्धेच्या मानसिकतेतून या वर्गाकडे धाव घेणाऱ्या पालकांचे प्रमाण सतत वाढतेच आहे.
प्रारंभी सरकारने शिक्षकांना, प्राध्यापकांना असे वर्ग घेण्यावर बंदी घातली. त्यातून पळवाटा शोधत हे वर्ग सुरूच राहिले. आता तर अनेक व्यावसायिक या शिकवणीच्या धंद्यात उतरले व त्यांनी या शासनाकडून वेतन घेणाऱ्या शिक्षकांना शिकवण्यासाठी बोलावणे सुरू केले. शासकीय रुग्णालय अथवा वैद्यक महाविद्यालयातील डॉक्टर खासगी व्यवसाय करू शकतात, मग आम्हीच काय घोडे मारले?, असा या शिकवणीत मन लावून शिकवणाऱ्या शिक्षकांचा सवाल आहे. यात त्यांना पैसा इतका मिळतो की, प्रसंगी नोकरीवर पाणी सोडायची सुद्धा त्यांची तयारी असते. शिकवणी वर्गाच्या या धंद्याने अलीकडच्या काही वर्षांत अनेक शाळांना सुद्धा आपल्या कवेत घेतले आहे. हे बघून विदर्भातील काही शिक्षण संस्थाचालकांनीच शिकवणी वर्ग सुरू केले आहेत. शिकवणीचा धंदा करणारे कोणतीही पायाभूत सुविधा नसलेल्या, शिक्षक नसलेल्या शाळा व महाविद्यालये हेरतात. विद्यार्थी फिरकत नसलेल्या या शाळांना मोठय़ा संख्येत विद्यार्थी पुरवठा करण्याची हमी शिकवणी वर्गाकडून दिली जाते. यात मोठी आर्थिक देवाणघेवाण होत असते. विदर्भ व नागपुरात अशा अनेक शाळा आहेत. शिक्षक नसलेल्या व वर्गखोल्या नसलेल्या या शाळांमधून दरवर्षी हजार ते अकराशे विद्यार्थी दहावी व बारावीच्या परीक्षेला बसत असतात. यात सामील होणाऱ्या विद्यार्थ्यांला शाळेत जायचेच नसते. त्याने फक्त शिकवणी वर्गात जायचे. त्यांचे शुल्क भरायचे व शेवटी थेट परीक्षाच द्यायची असते. नागपूरसारख्या शहरात प्रवेश प्रक्रिया केंद्रीकृत आहे. त्यावर शासनाचे नियंत्रण आहे, तरीही शिकवणी वर्गाकडून आलेले अर्ज बरोबर त्यांना हव्या त्या शाळा, महाविद्यालयांकडेच पोहोचतात. शिक्षणक्षेत्रातील काही जाणकारांच्या मते, संपूर्ण विदर्भात या शिकवणी वर्गाच्या धंद्यातून एका सत्रात होणारी आर्थिक उलाढाल १ हजार कोटींच्या घरात आहे. अनेक शिकवणी वर्गाचे जाहिरातींचे अंदाजपत्रकच वर्षांला ३ ते ४ कोटींच्या घरात असते. जेवढी जाहिरात मोठी तेवढी विद्यार्थ्यांची संख्या जास्त, या गणितावर या शिकवणी वर्गवाल्यांचा आता चांगलाच विश्वास बसला आहे.
शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयाकडे पाठ फिरवून शिकवणी वर्गाला हजेरी लावणारा विद्यार्थी खरोखरच चांगले गुण मिळवतो का?, अभ्यासात कच्चे असलेल्या किती विद्यार्थ्यांना या शिकवणी वर्गानी प्रावीण्य श्रेणीत आणून सोडले?, जात्याच हुशार नसलेल्या विद्यार्थ्यांना या शिकवणी वर्गात प्रवेश मिळतो का?, यासारख्या प्रश्नांवर सध्या पालकांना विचार करायला सुद्धा वेळ नाही. या शिकवणी वर्गातील वातावरण तरी शिक्षण घेण्यासाठी योग्य असते का?, याकडेही कुणी लक्ष देत नाही. अनेक शिकवणी वर्गात शंभरपेक्षा जास्त मुले असतात. तेथे शिकवणाऱ्या शिक्षकाला प्रत्येकाकडे लक्ष देणेच शक्य नसते. तरीही पालकांची पावले या वर्गाकडेच वळत असतात. जे आकर्षक आहे, जेथे जास्त पैसे मोजावे लागतात तेच पाल्यांच्या भल्याचे, असाच विचार आज होताना दिसतो. केवळ दहावी व बारावीचा विचार केला, तर या वगार्ंचे शुल्क अनेकदा पालकांचे आर्थिक गणित बिघडवणारे असते. दीड लाख व त्यापेक्षा जास्त असेच बहुतेक शिकवणी वर्गाच्या शुल्काचे स्वरूप आहे. प्रसंगी कर्ज काढून पालक हा खर्च करतात आणि मुळातच हुशार असलेला त्यांचा पाल्य चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला की, शिकवणी वर्गाला सारे श्रेय देऊन मोकळे होतात. या धंद्यातील फोलपणा, त्यात शिकवणाऱ्या कथित शिक्षकांची शैक्षणिक पात्रता, याकडे कुणीही लक्ष देताना दिसत नाही. ज्याचा गवगवा जास्त त्याच्या मागे धावण्याची वृत्ती समाजात नेहमीच आढळत असते. या शिकवणी वर्गांच्या बाबतीतही तेच घडताना दिसत आहे. गंमत म्हणजे, शिकवणीचा हा धंदा जेव्हा सुरू झाला तेव्हा त्याविरुद्ध बोलणारे, आवाज उठवणारे, कारवाई करा, असे साकडे शासनाला घालणारे अनेक होते. आता काळाच्या ओघात हा विरोधाचा सूर पूर्णपणे लुप्त झालेला आहे. काही राजकीय पक्षातील टगे अधून मधून आवाज उठवतात, पण त्यांचा संबंध केवळ खंडणीपुरता मर्यादित असतो. सरकार नावाच्या अजस्र यंत्रणेने सुद्धा हा धंदा आता मान्य केलेला दिसतो, यामुळे शाळा ओस पडत चालल्या आहेत व आर्थिक ऐपत नसलेले पालक व त्यांचे पाल्य या बाजाराकडे भिरभिरत्या नजरेने बघत आहेत.
– देवेंद्र गावंडे
devendra.gawande@expressindia.com