नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभेच्या पदवीधर प्रवर्गाची निवडणूक १९ मार्च रोजी होणार आहे. याच दिवशी नागपूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित यांचीही निवडणूक आहे. यामध्ये मतदार असणारे शिक्षक हे विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघामधीलही मतदार आहेत. त्यांची संख्या जवळपास साडेतीन हजारांवर आहे. मात्र, एका निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावल्यावर या शिक्षकांच्या हाताच्या बोटाला मतदान झाल्याची खूण म्हणून शाई लावली जाते. अशावेळी त्यांना दुसऱ्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क गमवावा लागणार असल्याने चिंता वाढली आहे.
विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातून निवडून द्यावयाच्या १० जागांकरिता रविवार १९ मार्चला सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहेत. नोंदणीकृत पदवीधरांच्या १० जागांकरिता निवडणूक लढविणाऱ्या एकूण ५१ उमेदवारांची यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली. या निवडणुकीत विविध प्रवर्गांतून एकूण १३ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले आहेत. विद्यापीठाची निवडणूक याआधीही तीनदा रद्द करण्यात आली आहे. विद्यापीठाची तयारी पूर्ण न झाल्याने एकदा तर दुसऱ्यांदा रविवारी निवडणूक घेण्याच्या कारणावरून ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने या निवडणुकीतील मतदार याद्यांमध्ये दोष असल्याने निवडणूक प्रक्रियाच स्थगित केली. त्यामुळे तिसऱ्यांदा निवडणूक रद्द झाली. आता विद्यापीठ संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नव्याने राबवत आहे. मात्र, १९ मार्चलाच नागपूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक होणार असल्याने पुन्हा एकदा अडचण निर्माण झाली आहे. एकाच दिवशी दोन ठिकाणी मतदान होणार असल्याने मतदारांची चिंता वाढली आहे.
हेही वाचा – नागपूर: महाराष्ट्रातील वीज दर कमी भासवण्याचा प्रयत्न; महावितरणच्या कारभाराबाबत आक्षेप
अडचण काय?
शिक्षक सहकारी पतसंस्थेमध्ये मतदार असणारे जवळपास साडेतीन हजार शिक्षक हे विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघामध्येही मतदार आहेत. मात्र, ते सहकारी पतसंस्थेच्या मतदानाला प्राधान्य देणार. येथे मतदान झाल्यावर त्यांच्या हातावर मतदानाची शाई लावली जाणार. यानंतर ते विद्यापीठाच्या मतदार केंद्रावर मतदानासाठी गेले असता शाई लावलेले बोट बघून मतदानाचा हक्क नाकारला जाण्याची शक्यता आहे.
५१ उमेदवार रिंगणात
नोंदणीकृत पदवीधरांच्या १० जागांकरिता निवडणूक लढवणारे एकूण ५१ उमेदवार रिंगणार आहेत. या निवडणुकीत विविध प्रवर्गांतून एकूण १३ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले आहे. उमेदवारांमध्ये विष्णू चांगदे, ॲड. मनमोहन वाजपेयी, वामन तुर्के, प्रशांत डेकाटे, प्रवीण उदापूरे, शिलवंत मेश्राम आदी माजी सदस्यांचा समावेश आहे.
हेही वाचा – महाविकास आघाडीमध्ये सध्या शिवसेना आहे कुठे? दीपाली सय्यद यांची उद्धव ठाकरेंवर टीका
दोन्ही निवडणुका एकाच दिवशी होणार असल्याने मतदारांचा गोंधळ होणार आहे. शिक्षक त्यांच्या पथसंस्थेच्या निवडणुकीला प्रथम प्राधान्य देण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यापीठाने त्यांना दुसऱ्यांदा मतदान करण्यासाठीही सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे विद्यार्थी कार्यकर्ता अतुल खोब्रागडे म्हणाले.