अमरावती : प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत अनेक शिक्षकांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ अन्यायग्रस्त शिक्षक समन्वय समितीच्यावतीने गुरूवारी येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने पाठिंबा दिला आहे.
बदलीपात्र शिक्षकांच्या अवघड क्षेत्रात कोणतेही निकष न पाळता बदल्या करण्यात आल्या, या बदल्या म्हणजे सहावा टप्पा रद्द करावा, अशी शिक्षकांची मागणी आहे. दुर्गम भागातील शिक्षकांना बदली प्रक्रियेत केवळ १ जागा उपलब्ध आहे. (संवर्ग-३ बदली अधिकार प्राप्त शिक्षक). संवर्ग १ मधील शिक्षकांना, सुगम भागातील शिक्षकांना आणि दुर्गम भागातील शिक्षकांना वेगवेगळ्या अटी आहेत. ५३ वर्षांच्या वरील शिक्षक, दुर्धर आजार असलेले आणि ज्येष्ठ महिला शिक्षकांची अतिदुर्गम भागात बदली रद्द करणे, अशाही मागण्या आहेत.
हेही वाचा >>> गारपीट व मुसळधार पावसाचे थैमान; तीन जनावरे ठार, शेकडो फळबागा उद्ध्वस्त
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सपाटीवरील शाळांचे भवितव्य धोक्यात आल्याचा आक्षेप शिक्षकांनी घेतला आहे. विषय शिक्षकांची पदस्थापना होऊन एक वर्ष देखील होत नाहीर, तर बदली करण्यात येते. या टप्प्यामुळे सुगम भागातील ३०६ शिक्षक दुर्गम भागात स्थानांतरीत झाल्याने सुगम क्षेत्रातील अनेक शाळा शिक्षकाविना राहणार आहेत. या बदली प्रक्रियेमुळे यापुर्वीही दुर्गम भागात ३ ते १२ वर्षे सेवा देणा-या शिक्षकांचे पुन्हा दुर्गम भागात स्थानांतर झाले आहे. या बदली प्रक्रियेत अनेक अनियमितता आणि अन्याय झाल्याने शेवटचा सहावा टप्पा रद्द करावा, अशी मागणी आंदोलकर्त्या शिक्षकांनी केली आहे.