समाज माध्यमावर मोहीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी सर्वच स्तरातून याला विरोध होत आहे. विद्यार्थी पालकांसह आता शिक्षकांनीही सरसकट शाळा बंद विरोधात समाज माध्यमावर मोहीम सुरू केली आहे. ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ असे स्लोगन देणाऱ्या शिक्षण मंत्र्यांनी दहावी, बारावीचे विद्यार्थी, त्यांच्या आगामी परीक्षांचाही विचार न करता हा निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे. शाळा बंद करण्यापेक्षा नियोजन करून शाळा सुरू ठेवाव्या, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. ग्रामीण भागांमध्ये करोनाचा शिरकाव नसतानाही शाळा बंद आहेत. ग्रामीण भागात इंटरनेटची अडचण असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे. अनेक विषय ऑनलाईन पद्धतीने समजून घेता येत नाहीत. यामुळे शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू ठेवण्याची मागणी शिक्षक करीत आहेत.

स्थानिक पातळीवर निर्णय घ्या

मुलांना ऑनलाईन शिक्षणात अनेक अडचणी येत असून शाळेत त्यांच्याकडून व्यवस्थित अभ्यास घेतला जात असल्याने स्थानिक पातळीवर करोनाची परिस्थिती पाहून शाळेचा निर्णय घेण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा तरी विचार करा

शिक्षणमंत्र्यांनी दोन वर्षांत शाळांवर निधीच खर्च केला नाही. शाळा बंद करून हात वर करण्याचे कामे सुरू आहे. यापेक्षा करोना परिस्थितीमध्येही शाळा कशा सुरू ठेवता येतील याचे नियोजन करायला हवे होते. ५० टक्के उपस्थितीने इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू ठेवता आले असते. दहावी आणि बारावीच्या सराव परीक्षा सुरू असताना शासनाने घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा असल्याचा आरोप शिक्षण तज्ज्ञ प्रा. सपन नेहरोत्रा यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers protest school closure campaign ysh