अमरावती: एकीकडे आधीच अनेक अशैक्षणिक कामांचे ओझे बाळगणाऱ्या शिक्षकांवर आणखी एक जबाबदारी देण्यात आली आहे. घरोघरी जाऊन आयुष्मान कार्ड काढण्याचे नवे काम शिक्षकांकडे सोपविण्यात आले असून हे अशैक्षणिक काम न करण्याचा पवित्रा शिक्षक संघटनांनी घेतला आहे.
विशेष म्हणजे आयुष्मान भारत कार्डचा उपक्रम आरोग्य विभागाशी संबंधित असला तरी त्या कामावर आता शिक्षकांना नियुक्त केले जाणार असल्याने शिक्षकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. प्रधानमंत्री जनारोग्य योजनेंतर्गत आयुष्मान भारत कार्डची ई केवायसी करणे तसेच आयुष्मान कार्ड तयार करून ते घरोघरी वितरित करण्याबाबतचे आदेश जिल्ह्यात भातकुली पंचायत समितीकडून पहिल्यांदाच देण्यात आले आहे. त्यासंदर्भात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून यादी सुद्धा तयार करण्यात आली आहे. जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून तसे आदेश देण्यात आले आहे.
हेही वाचा… UPSC Exam: यूपीएससी परीक्षेतील चुका सुधारण्यासाठी आयोगाकडून मार्गदर्शक सूचना
विशेष म्हणजे हे अभियान आरोग्य विभागाशी संबंधित असून आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी, ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना सोडून शिक्षकांवर त्याची जबाबदारी देण्यात आली आहे, असा संघटनांचा आरोप आहे. शिक्षकांनी या कामाला विरोध दर्शविला आहे. शैक्षणिक कार्य सोडून अशैक्षणिक कामांचा सपाटा शासनाने लावला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेवरसुद्धा परिणाम होत आहे. त्यामुळे शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे काढून घ्यावीत, अशी मागणी शिक्षक संघटना करीत असून आता आयुष्मान भारत अभियानातून सुद्धा मुक्त करावे, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली आहे.
शैक्षणिक कार्य कधी करावे?
वास्तविक आयुष्मान भारत कार्ड काढण्याचे काम आरोग्य विभागाशी संबंधित आहे. मात्र हे काम शिक्षकांवर थोपण्यात आले आहे. शिक्षकांना शाळा सोडून लोकांच्या घरोघरी फिरावे लागणार आहे. मग शैक्षणिक कार्य कोणत्या वेळेत करावे, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी उपस्थित केला आहे.