विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात शिकायचे आणि शिक्षकांनी त्यांना शिकवायचे, असा लिखित नियम असताना रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी नवरात्रीतील गरब्याचा आनंद लुटत असताना त्यांच्या संरक्षणार्थ प्राध्यापकांना मध्यरात्रीपर्यंत कामावर ताटकळत उभे रहावे लागत असल्याने काही प्राध्यापकांनी ‘लोकसत्ता’ कडे तक्रारी करून या अन्यायाचा पाढा वाचला.
अभ्यासाच्या तणावातून थोडीशी उसंत मिळावी म्हणून विद्यार्थ्यांसाठी १३ ते २१ ऑक्टोबरदरम्यान आंध्र असोसिएशनच्या अमृत भवनात गरबा नृत्य आयोजित करण्यात आले आहे. हा गरबा सुरू झाल्यापासून प्राध्यापकांनी अध्यापनाबरोबरच या गरबा वर्गानाही हजेरी लावणे प्राचार्यानी सक्तीचे केले आहे. सकाळी ९.३० वाजता महाविद्यालयात अध्यापनासाठी आलेले प्राध्यापक, प्रात्यक्षिक आणि इतर शैक्षणिक कामे उरकून सायंकाळी ६ वाजता अमृत भवनात हजेरी लावतात. साधारणत: सायंकाळी ७ ते रात्री १० पर्यंत गरबा नृत्याचा आनंद विद्यार्थी लुटतात. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विधि आणि इतर अभ्यासक्रमांच्याही विद्यार्थ्यांना गरबा नृत्यात भाग घेतला आहे. ते नृत्य करीत असताना त्यांच्यावर देखरेख करणे, मुलींची छेडछाड रोखणे, अप्रिय घटना टाळणे, यावर प्राध्यापकांना देखरेख करावी लागते. यासंबंधीची सर्व छायाचित्रे ‘रायसोनी धमाल दांडिया न्युज’ या फेसबुकवर उपलब्ध आहेत. विद्यार्थी नृत्याच्या तालावर नाचत असताना प्राध्यापकांना त्यांना कडे करून संरक्षकाची भूमिका अदा करावी लागते.
केवळ गरबाच नव्हे, तर इतर त्रास प्राध्यापकांना सहन करावे लागत असल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे. विद्यापीठाला ३० सप्टेंबरची लक्ष्मीनारायण दिनाची सुटी असताना रायसोनी समूहाचे अनेक विभाग सुरू होते. त्या दिवशी एमबीएची समिती इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि आयटी विभागासाठी आलेली असताना महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, संगणक विज्ञानसारखे इतरही विभाग सुरू ठेवण्यात आले होते.
दुसरे म्हणजे, ईदची सुटी केवळ मुस्लिम लोकांनाच देण्यात आली. ईद आणि २ ऑक्टोबरची म. गांधी जयंती या केंद्र शासनाच्या सुटय़ाही दिल्या गेल्या नाहीत. गणेशचतुर्थीला महाराष्ट्र शासनाची सुटी असताना प्राध्यापक रात्री आठपर्यंत महाविद्यालयात होते. इतर महाविद्यालयातील प्राध्यापक गणपतीची घरी प्रतिष्ठापना करीत असताना रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक मात्र, महाविद्यालयात गणपतीची प्रतिष्ठापना करीत होते. आश्चर्य म्हणजे, रायसोनी समूहाची इतर महाविद्यालये व त्यांच्या अंतर्गत येणारे विभाग सुटीचा लाभ घेत असताना केवळ जीएच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांनाच हा त्रास सहन करावा लागतो, अशा तक्रारी प्राध्यापकांनी केल्या आहेत.
यासंदर्भात रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रीती बजाज यांच्याशी वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी संभाषण टाळले. तसेच संदेशही टाकला. मात्र, त्यालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दूरध्वनीवर त्यांनी प्रतिसाद दिला. मात्र, ‘लोकसत्ता’चा दूरध्वनी असल्याचे त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी तो बंद करून बोलणे टाळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा