देवेश गोंडाणे
नागपूर : १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये राज्य शासनाने तासिका प्राध्यापकाचे मानधन वाढवले त्यावेळी जो निर्णय काढण्यात आला त्यानुसार तासिका तत्त्वावर नियुक्त प्राध्यापकाला कुठल्याही एकाच महाविद्यालयात अध्यापन करता येईल, अशी अट घालण्यात आली होती. परंतु, या अटीचे उल्लंघन अनेक तासिका प्राध्यापक दोन महाविद्यालयात अध्यापन करून शासनाची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शासकीय आणि अशासकीय महाविद्यालय, विद्यापीठांचे शैक्षणिक विभाग यातील तासिका प्राध्यापकांचे मानधन सारखे केले आहे. तसेच एकाच महाविद्यालयात काम करण्याची अट कायम ठेवली आहे.
त्यानुसार, तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांनी एकाच महाविद्यालयात काम करणे अपेक्षित आहे. त्यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र देखील हे प्राध्यापक लिहून देतात. मात्र, नागपूरसह राज्यातील अनेक महाविद्यालयात तासिका तत्त्वावरील प्राध्यापक दोन वेगळ्या महाविद्यालयात अध्यापन करीत असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा >>>यवतमाळ : व्हॉट्सअॅप टास्क पडले महाग! पोलिसांच्या प्रयत्नाने ऑनलाइन फसवणुकीतील दोन लाख ‘होल्ड’
नागपुरात वसंतराव नाईक समाज विज्ञान संस्था, शासकीय विज्ञान संस्था आणि विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागात जे तासिका प्राध्यापक काम करतात त्यातील बरेच प्राध्यापक हे इतरही महाविद्यालयात, तर काही रात्रकालीन महाविद्यालयात काम करत आहेत व दोन-दोन ठिकाणी मानधन घेत आहेत. ही बाब अनेक विभागप्रमुखांना माहिती असून देखील महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विद्यापीठ, सहसंचालक यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे.
हेही वाचा >>>अमरावती: चिखलदऱ्यासाठी शनिवार, रविवारी एकमार्गी वाहतूक; जाण्यास धामणगाव- मोथा, तर येण्यासाठी घटांग मार्ग
नियम काय?
तासिका प्राध्यापकांच्या मानधनवाढीसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २७ मार्च २०२३ला शासन निर्णय काढला आहे. त्यामध्ये सुद्धा मानधन वाढ केल्यानंतर १४ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयामधील नियम आणि अटी कायम राहतील असे नमूद करण्यात आले आहे. परंतु, या नियम आणि अटींना धाब्यावर बसवले जात आहेत.
तासिका प्राध्यापकाची नियुक्ती करताना त्यांच्याकडून एकाच ठिकाणी काम करण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते. त्यामुळे कुणी दोन महाविद्यालयात काम करत असल्याचे समोर आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.- डॉ. संजय ठाकरे, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग.