दोन्ही पायांनी अपंग असलेले पती-पत्नी रडत-रडत पारडी पोलीस ठाण्यात आले. उदरनिर्वाहासाठी घेतलेला ई-रिक्षा चोरी गेल्यामुळे उपासमार होत असल्याची स्थिती त्यांनी पारडीचे ठाणेदार कोटनाके यांना सांगितली. त्यांनी ठाण्यातील जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांना कामाला लावून दोन चोरांना अटक केली. ई-रिक्षा अपंग दाम्पत्याच्या स्वाधीन करीत आर्थिक मदतही केली. खाकीतील प्रेम आणि माणुसकी बघून दाम्पत्याच्या डोळ्यात अश्रू आले.
विनोद मांगलालजी पवार (३०, चंद्रनगर, पारडी) आणि पदमा हे दोघेही पायाने अपंग. मूळचे मध्यप्रदेशातील असून कामाच्या शोधात नागपुरात आले. त्यांनी पारडीतील चंद्रनगरात भाड्याने खोली घेऊन संसार सुरू केला. दोघेही अपंग असल्यामुळे सुरुवातीला त्यांनी गोळ्या-बिस्कीट विकून उदरनिर्वाह केला. त्यांना ६ महिन्यांचा बाळ आहे. जबाबदारी वाढल्यामुळे विनोदने काही नातेवाईकांकडून कर्ज घेऊन ई-रिक्षा विकत घेतला.
कधी पत्नी तर कधी विनोद या दोघांनी रिक्षा चालवून पोट भरणे सुरू केले. गेल्या ११ ऑगस्टला कौटुंबिक कार्यक्रमासाठी दोघेही मध्यप्रदेशात गेले. या दरम्यान दारात उभा असलेल्या ई-रिक्षासह ३५ हजार रुपये किंमतीच्या ४ बॅटऱ्या चोरी गेल्या. २३ ऑगस्टला विनोद आणि पदमा हे घरी परतले. ई-रिक्षा चोरी गेल्याचे कळताच दोघांनीही भविष्यात काय होणार? असा विचार करून रडारड सुरू केली. ते पारडी पोलीस ठाण्यात गेले. ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी त्यांचे दु:ख समजून घेतले.
हेही वाचा : नागपूर : केवळ धक्का लागला म्हणून युवकाला धावत्या रेल्वेतून दिले फेकून
त्यांनी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना एकत्र बोलावून दाम्पत्याचा ई-रिक्षा शोधण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. चोवीस तासांत पोलिसांनी आरोपी अमन लोखंडे (वाठोडा) आणि रूपेश लोखंडे (उडिया मोहल्ला) या दोघांना अटक करून ई-रिक्षा हस्तगत केला. लगेच विनोद आणि दाम्पत्याला संदेश पाठवून ठाण्यात बोलावून घेतले. चोरी गेलेला ई-रिक्षा बघताच अपंग पती-पत्नीच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
दाम्पत्याला प्रेमाची भेट
ई-रिक्षा चोरी गेल्यामुळे विनोद आणि पदमाची मजुरी बंद झाली. त्यामुळे घरात खायला अन्नधान्य नव्हते. पोळा सणाच्या पूर्वसंध्येला उपाशी राहण्याची वेळ अपंग दाम्पत्यावर आली. ही बाब पोलीस उपायुक्त सारंग आवाड, सहायक आयुक्त संतोष खांडेकर आणि ठाणेदार मनोहर कोटनाके यांच्या लक्षात आली. खाकीतील कठोर मनाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी माणुसकीची परिचय दिला. त्यांनी दाम्पत्याला तीन महिन्यांचा किराणा आणि काही आर्थिक मदत करीत आनंदाने दाम्पत्याला घरापर्यंत पोहचवून दिले.