गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी आज, १९ एप्रिल रोजी सकाळीपासुन मतदान प्रक्रिया सुरू झाली. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या गोरेगाव तालुक्यातील तिल्ली/ मोहगाव मतदान केंद्रावरील बूथ क्रमांक ४८ वर तांत्रिक अडचण निर्माण झाली.
मतदान केल्यावर ईव्हीएम मशीन मधून वीवीपी पॅट स्लीप निघत नसल्याचे समोर आले. यामुळे मतदारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे सकाळी ९:३० वाजतापासून मतदान प्रक्रिया बंद पडली. दरम्यानचा तब्बल तीन तास मतदान प्रक्रिया बंद होती. यादरम्यान २६१ मतदान झाले होते.
हेही वाचा…नागपूर : मतदान केंद्रावर सापाने प्रवेश केला अन्…
केंद्रावरील अधिकाऱ्यांनी दखल घेत आपल्या वरिष्ठांना कळविल्या नंतर तांत्रिक पथक नवीन वीवीपी पॅट घेऊन या मतदान केंद्रावर पोहचले आणि ती बदलवून दुसरे वीवीपी पॅट मशीन लावल्यानंतर तपासणी करून मतदान सुरळीत होत असल्याची खात्री केली. अशी ही तांत्रिक अडचण दूर केल्यानंतर ११:३० वाजता पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान या केंद्रावर सुमारे दोन तास मतदान प्रक्रिया बंद ठेवावी लागली असल्याची माहिती तिल्ली/ मोहगाव येथील निवडणूक अधिकारी यांनी दिली.