विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पीएच.डी.च्या नियमांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे संशोधकांना आता ‘स्वयंम पोर्टल’वर ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करून त्यातून ‘क्रेडिट पॉइंट्स’ गोळा करायचे आहेत. मात्र, ‘स्वयंम पोर्टल’वर विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रमांना महत्त्व देण्यात आले आहे. शिवाय हे अभ्यासक्रम केवळ इंग्रजीमध्ये आहेत. त्यामुळे मराठी, हिंदी भाषेमध्ये संशोधन करणाऱ्या मानव्यशास्त्राच्या संशोधकांसमोर अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीएच.डी. नोंदणी कल्यावर ‘कोर्सवर्क’ करणे आवश्यक आहे. मात्र, या वर्षीपासून ‘स्वयंम पोर्टल’वर ऑनलाईन अभ्यासक्रम करून त्यातून ‘क्रेडिट पॉइंट्स’ गोळा करायचे आहेत. पण या अभ्यासक्रमात मानव्यशास्त्र आणि आंतरशाखीय विद्यार्थ्यांना कोर्सवर्क करताना अडचण येत असल्याने क्रेडिट पॉइंट कसे मिळावावे, असा प्रश्न प्रश्न पडला आहे.

‘यूजीसी’ने दोन वर्षांपूर्वी पीएच.डी.च्या नियमात बदल केले. त्यानुसार विद्यार्थ्यांना ‘स्वयंम पोर्टल’वर विविध अभ्यासक्रम पूर्ण करून शंभर ‘क्रेडिट पॉइंट्स’ गोळा करायचे आहेत. यामध्ये पहिले सहा ‘क्रेडिट’ मिळवण्यासाठी संशोधन कार्यप्रणाली आणि त्याच्याशी निगडीत तीन अभ्यासक्रम पूर्ण करायचे आहेत. याशिवाय विद्यापीठ किंवा त्यांच्या विषयाशी संबंधित राष्ट्रीय परिषद आणि चर्चासत्रांमध्ये सहभागी होऊन ‘क्रेडिट’ मिळवायचे आहेत. मात्र ‘स्वयंम पोर्टल’चे अभ्यासक्रम हे आयआयटीमधील तज्ज्ञांनी तयार केले आहेत. त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी निगडीत भ्यासक्रमांना प्राधान्य दिले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमाशी संबंध असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत असला तरी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर मानव्यशास्त्र आंतरशाखीय विद्यार्थ्यांना ते जड जात आहे.

दुसरीकडे संपूर्ण अभ्यासक्रम इंग्रजीत असल्याने मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना त्यातील काहीही कळत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांनी मराठीमध्ये हे अभ्यासक्रम सुरू करावे, अशी मागणी होत आहे. काही विद्यापीठांनी याची सुरुवात केली असली तरी बहूतांश विद्यापीठांमध्ये अद्यापही हे अभ्यासक्रम इंग्रजीमध्येच आहेत.

संशोधन केव्हा करणार?
विद्यार्थ्यांना सहा महिने ते एका वर्षांत शंभर ‘क्रेडिट पॉइंट्स’ कमवायचे असल्याने यात त्यांचा एका वर्षांचा कालावधी निघून जातो. नियमित विद्यार्थ्यांना तीन वर्षांच्या कालावधीमध्ये पीएच.डी. चा शोधप्रबंध पूर्ण करून तो सादर करायवयाचा असतो. मात्र, सुरुवातीलचा बहूतांश कालावधी हा स्वयंम पोर्टलवरील कठिण अभ्यासक्रमांमुळे ‘क्रेडिट पॉईंट्स’ कमविण्यात जात असल्याने शोधप्रबंध केव्हा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होत आहे.

स्वयंम पोर्टलवरील अभ्यासक्रम हा पीएच.डी.साठी नोंदणी करण्यापूर्वीचा आहे. तो केल्याने विद्यार्थ्यांला पीएच.डी. चा विषय कसा निवडायचा, पीएच.डी.चा लघु शोधप्रबंध कसा तयार करायचा याबाबत माहिती मिळते. मात्र, पीएच.डी.साठी विद्यापीठांमध्ये नोंदणी केल्यावर स्वयंम पोर्टलवरील अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे नवीन काम लावून दिल्याने संशोधकांचे नुकसान होत आहे. यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने याबाब योग्य ते निर्देश द्यावे. – डॉ. अजित जाचक, संशोधक मार्गदर्शक

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Technology course for researchers in marathi hindi medium nagpur amy