रेल्वेच्या इंजिनाखाली एक वृद्ध अडकला आहे. त्याच्या सर्वागातून रक्त वाहते आहे. जिवंत असलेल्या या वृद्धाला बघण्यासाठी शेकडो लोक जमले आहेत. घटनास्थळ निर्जन ठिकाणी असल्याने त्यात प्रवासीच जास्त आहेत, पण बघ्यांपैकी कुणीही या वृद्धाला बाहेर काढणे तर सोडाच उलट, बहुतेक जण या अपघाताचे चित्रण स्वत:च्या मोबाईलवर करण्यात गुंग आहेत. हा प्रकार बघून संतापलेले रेल्वेचे कर्मचारी बघ्यांवर ओरडतात व जखमी वृद्धाला बाहेर काढण्यासाठी धडपड सुरू करतात. कर्मचाऱ्यांच्या या ओरडण्याचा फारसा परिणाम बघ्यांवर होत नाही. उलट, ते त्या वृद्धाला सोडवत असतानाचे चित्रण सुरूच ठेवतात. हा प्रसंग अकोल्याजवळचा आहे. या घटनेत चित्रण करणारे बघे तसे रिकामे होते, पण जेथे जीवनमरणाची लढाई सुरू आहे तेथेही अगदी जीव धोक्यात घालून मोबाईलवर चित्रण करणारे महाभाग आहेत. मध्यंतरी गडचिरोलीत नक्षलवाद्यांबरोबरची एक चकमक एका जवानाने चित्रबद्ध केली होती. या जवानाच्या आजूबाजूने गोळ्या जात होत्या व तो चित्रणात व्यस्त होता. हे चित्रणाचे वेड आता अतिशय धोकादायक पातळीवर पोहोचू लागले आहे. अडचणीत असलेल्या प्रत्येकाला मदत करणे, हा मानवी स्वभाव मानला जातो. त्यातल्या त्यात अपघात असेल तर मदतीसाठी अनेकजण धावून येतात, असा आजवरचा अनुभव आहे. कुणाचाही जीव वाचवणे यासारखे पुण्यकर्म नाही, अशी शिकवण आपल्याला लहानपणापासून मिळालेली आहे. चांगले आणि वाईट यासंबंधीच्या आपल्या कल्पना सुध्दा बऱ्यापैकी स्पष्ट आहेत. आईवडील, गुरूजन यांनी सांगितलेल्या अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला अशा वेळी आठवतात. माणूस कितीही वाईट असला तरी अशा आणीबाणीच्या प्रसंगात त्यातील सद्गुण जागा होतो. मनात खोलवर दडलेले संस्कार उफळून बाहेर येतात व मदतीसाठी हात आपोआप पुढे होतात.
अकोल्याच्या घटनेत सहभागी असलेल्या बघ्यांपैकी एकाच्याही मनात त्या वृद्धाला वाचवता कसे येईल, बाहेर कसे काढता येईल, असा विचार आला नसेल का? जखमी अवस्थेत विव्हळत पडलेल्या या वृद्धाला तातडीच्या मदतीची गरज आहे, असेही कुणाला वाटले नसेल का? या वृद्धाच्या जिवापेक्षा चित्रण महत्त्वाचे, अशी भावना या बघ्यांच्या मनात का निर्माण झाली असेल? चित्रणात व्यस्त असलेले किंवा नुसतेच बघत असलेले हे जे कुणी लोक होते ते सर्वच वाईट वृत्तीचे होते, असे समजण्याचे काही कारण नाही. त्यांच्यावरही कुणीतरी चांगले संस्कार बिंबवलेले असतीलच. तरीही कुणाला धावपळ करावीशी वाटत नसेल, तर हे समाजव्यवस्थेचे अपयश समजायचे का, यासारखे अनेक प्रश्न या घटनेने उभे राहिले आहेत. मध्यंतरी मुंबईत सुध्दा असाच प्रकार घडला होता. त्यावर बरीच टीका झाली. तरीही हे प्रकार वाढत असतील तर दोष कुणाला द्यायचा? नव्या तंत्रज्ञानाला की समूहाच्या बदलत्या मानसिकतेला?, यावरही विचार व्हायला हवा. मोबाईल हा नव्या तंत्रज्ञानाचा अविष्कार आहे. हे तंत्रज्ञान आता सर्वत्र स्वीकारले गेले आहे. ते स्वीकारताना त्यातल्या चांगल्या व वाईट बाजूचा विचार करण्याच्या भानगडीत बहुसंख्य पडत नाहीत. नेमकी येथेच खरी अडचण आहे. तंत्रज्ञान स्वीकारणे वेगळे आणि त्याच्या आहारी जाणे वेगळे, हा फरकसुध्दा अनेकांच्या लक्षात येत नाही. कोणत्याही तंत्रज्ञानाचा जसा वापर होतो तसाच गैरवापर होतो. बहुसंख्यांचे गैरवापराकडेच जास्त लक्ष असते. तंत्रज्ञानाची सवय लावून घेणे यात काहीही वाईट नाही, पण त्याच्या आहारी गेले की, मनावरचे नियंत्रण सुटते व अकोला, गडचिरोलीसारखे प्रकार घडू लागतात. तंत्रज्ञान सभ्यपणे वापरावे ही शिकवण कुठेही दिली जात नाही. त्यामुळे मग गोंधळ उडतो. त्यातूनच मग अनेक ठिकाणी मोबाईल वापरू नये, असे फलक लावावे लागतात तरीही भर कार्यक्रमात, दु:खाच्या प्रसंगी तो वाजतो व त्यावर मोठमोठय़ाने बोलणारे महाभाग हमखास दिसतातच.
सभ्यतेचे निकष न पाळणाऱ्या अशा छोटय़ा घटनांकडे दुर्लक्षही करता येईल, पण मदत करायची सोडून अपघाताचे चित्रीकरण करणाऱ्यांचे काय, हा प्रश्न उरतोच. डोळ्यासमोर अपघात घडणे हा तसा दुर्मीळ प्रसंग. अशा प्रसंगाचा साक्षीदार होतो, हे दाखवण्याच्या नादात असले प्रकार होत असतील तर ते वाईट आहे. मनाच्या रचनेत विवेकाला मोठे स्थान आहे, असे मानसशास्त्र सांगते. या विवेकावरच आपले वर्तन आधारलेले असते. कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणारी मंडळी हा विवेक गमावून बसतात. गडचिरोलीत चकमकीचे चित्रण करणाऱ्या जवानाला नंतर अधिकाऱ्यांनी खूप प्रश्न विचारले. या चित्रण करण्याच्या नादात एखादी गोळी डोक्यात शिरली असती तर काय, असाही प्रश्न विचारला तेव्हा तो जवान मी याचा विचारच केला नव्हता, असे उत्तरला. नवा मोबाईल, त्यात चित्रीकरणाची सोय हीच बाब त्याला अगदी जीवनमरणाच्या प्रसंगातही हरखून जाण्यासाठी पुरेशी ठरली. नव्या तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. या तोटय़ांवर फारशी चर्चा होत नाही. कुणी तोटे सांगायला गेलेच तर त्याला मागास ठरवले जाते. सध्या तर मोबाईल न वापरणाऱ्या व्यक्तीकडे आश्चर्याने बघण्याचे दिवस आले आहेत. या तंत्रज्ञानामुळे संपर्कात सुलभता आली, घटना साक्षांकीत होऊ लागल्या, खोटारडेपणा समोर येऊ लागला. एकूणच सारे जग जवळ आले, हे खरे असले तरी विवेक व माणूसकी गमावण्याचे प्रकार वाढू लागले, हेही खरे. अकोल्याचा वृद्ध वेळेवर उपचार मिळाले असते तर तो वाचला असता, हे डॉक्टरांचे म्हणणे आपण लक्षात घेणार की नाही?
– देवेंद्र गावंडे
माणुसकीला हरवणारे तंत्रज्ञान!
रेल्वेच्या इंजिनाखाली एक वृद्ध अडकला आहे. त्याच्या सर्वागातून रक्त वाहते आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:
आणखी वाचा
First published on: 15-09-2015 at 07:23 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Technology over humanism