लोकसत्ता टीम
चंद्रपूर : जड वाहतुकीमुळे रस्ता खराब होत आहे असे कारण समोर करित तेलंगणा पोलीसांनी महारष्ट्र व तेलंगणा या दोन राज्याला जोडणाऱ्या पोडसा येथील वर्धा नदीच्या पुलावर वाहतुक रोखून धरली आहे. तेलंगणा सरकारच्या या अजब फतब्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान मागील ४८ तासांपासून चार ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांची लांबच लांब रांग लागली आहे. राज्य सरकारने यात हस्तक्षेप करावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात होणाऱ्या जड वाहतूकीमुळे मार्गाचे नुकसान होत असल्याचा ठपका ठेवीत तेलंगणा प्रसाशानाने दोन राज्याला जोडणाऱ्या पुलावरील वाहतूकीला रोख लावला आहे.एवढच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील सीमेत येऊन तेलंगणा पोलीस वाहनावर कारवाई करीत आहेत. या प्रकाराने महाराष्ट्राचा शेवटचा टोकावर असलेल्या पोडसा या गावातील गावकरी चांगलेच संतापाले आहेत. मागील 48 तासापासून दोन राज्याला जोडणाऱ्या पोडासा पुलावर वाहतूक खोडंबली आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पोडसा गावाला लागून वर्धा नदीचे पात्र आहे.वर्धा नदीचा पात्राने महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याला विभागले आहे. या नदी पात्रावर दहा वर्षांपूर्वी पुलाची निर्मिती झाली.
दोन्ही राज्यातील वाहतूक सुरु झाली. त्यामुळे महाराष्ट्र-तेलंगणा राज्याचे संबंध अधिक दृढ झाल्याचे बोलले जात होते. मात्र तेलंगणा प्रशासनाच्या एका कृतीने या संबंधाला तळा जाण्याची भीती आता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातून होणाऱ्या वाहतुकीमुळे तेलंगणा राज्यातील मार्गाचे नुकसान होत असल्याच्या जावई शोध तेलंगणा प्रशासनाने काढला. आणि त्यांनी थेट महाराष्ट्र राज्याच्या सीमेत पोलिसांना पाठवून वाहतूक बंद केली. यामुळे सीमावरतीच भागातील नागरिक चांगले संतापले आहेत. यासंदर्भात तेलंगणा राज्यातील शिरपूर पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराशी संपर्क साधला असता ते म्हणाले, टोल टॅक्स वाचविण्यासाठी पोडसा-सिरपूर मार्गाचा वापर केला जात आहे. या मार्गाने होणाऱ्या जडवाहतुकीमुळे मार्गाचे नुकसान होत असून गावकऱ्यांनाही त्रास सहन करावा लागात आहे.
दरम्यान तेलंगणा सरकारच्या या अजब निर्णयामुळे सिमावर्ती भागात चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांची रांगा लागली आहे. पोडसा या गावचे सरपंच देविदास सातपुते यांनी तेलंगणा सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. महाराष्ट्र सरकारने यात हस्तक्षेप करून तातडीने तोडगा काढावा अशी मागणी लावून धरली आहे. पोडसाचे उपसरपंच गुरूदास उराडे यांनीही तेलंगणा सरकारचे पोलीस महाराष्ट्राच्या हद्दीत येवून कशी काय कारवाई करू शकतात असा प्रश्न उपस्थित केला आहे तर ग्रामस्थांनी व ट्रक चालकांनीही या अजब फतब्याचा विरोध केला आहे.