नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा, तर दुसरीकडे अवकाळी पाऊस आहे. एरवी होळीच्या नंतर तापमान वाढीस सुरुवात होत असताना, यावेळी होळीच्या आधीच तापमानाचे चटके जाणवायला लागले. साधारण मे महिन्यात तापमान ४२ अंश सेल्सिअसपलीकडे जाते. यावेळी मात्र मार्च महिना संपण्याआधीच तापमानाचे नवनवे उच्चांक नोंदवले जात आहे. राज्यात विदर्भातील ब्रम्हपूरी येथे सर्वाधिक ४२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
मार्च महिना संपण्याआधीच राज्यात हवामान खात्याकडून दोनदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. गुरुवारी अकोला येथे ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर शुक्रवारी ब्रम्हपूरी येथे ४२.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. वातावरणात उकाड्यासोबतच उन्हाचे चटके जाणवायला लागले आहेत. राज्यातील तापमानात झपाट्याने वाढ होत असून विदर्भाला तापमानाची सर्वाधिक झळ पोहचत आहे. अकोला, ब्रम्हपूरी या शहरांमध्ये तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असतानाच इतर शहरातदेखील तापमान वाढायला लागले आहे. संपूर्ण विदर्भालाच तापमानाची झळ पोहचली आहे. जवळजवळ सर्वच शहरांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशाच्या पलीकडे गेला आहे.
उपराजधानी नागपूर येथेही तापमान ४१ अंश सेल्सिअस पलीकडे गेले. राज्यात हळूहळू तापमान वाढत असतानाच विदर्भात उष्णतेच्या झळ बसत आहेत. राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव तर विदर्भातील बुलढाणा, अमरावती, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, नागपूर अकोला येथे तापमान कमालीचे वाढत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून खासकरुन विदर्भ, मराठवाड्यातील तापमानात वाढ होत आहे. गुरुवारी अकोला येथे ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर शुक्रवारी ब्रम्हपुरी येथे ४२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, ३१ मार्च, १ आणि २ एप्रिलला मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा येत्या दोन दिवसात वाहणार आहे तर ३१ मार्च, १ आणि २ एप्रिलला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.