नागपूर : राज्यात तापमानाचा आलेख वाढतच चालला आहे. विदर्भ या तापमानात अक्षरशः होरपळून निघत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमान सातत्याने ४२ अंश सेल्सिअसपलीकडे चालले आहे. एकीकडे तापमानात झपाट्याने वाढ होत असताना हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबई, पालघर, ठाणे याठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या मध्यान्हनंतर ऊन तापायला सुरुवात झाली. मार्च महिन्यात उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत गेल्या. हवामान खात्याने देखील मार्च संपण्याआधीच दोनदा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. मार्चच्या अखेरीस तापमान ४२ अंश सेल्सिअसपलीकडे पोहचले. रविवारी देखील विदर्भातील तीन शहरात तापमान ४२ अंश सेल्सिअसपलीकडे गेले होते. चंद्रपूर येथे सर्वाधिक ४२.४, अकोला येथे ४२.३ तर ब्रम्हपुरी येथे ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ गडचिरोली येथे ४१.४, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती येथे ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मार्च महिन्यात उन्हाच्या झळा वाढल्या असून गेल्या आठवड्यापासून उन्हाचे तीव्र चटके बसायला सुरुवात झाली आहे.

तापमानातील प्रचंड वाढीमुळे नागरिकांना प्रचंड ताप सहन करावा लागतोय. त्यामुळे आरोग्याच्या किरकोळ तक्रारी सुरू झाल्या आहेत. दरम्यान, केरळ आणि दक्षिणेकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात बदल होत आहे. त्याचा परिणाम राज्यावर होणार असून एप्रिलच्या पहिल्याच दिवसापासून अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुंबईसह ठाणे, पालघर रायगड जिल्ह्यात सोमवार, मंगळवार, आणि बुधवार काही भागात पूर्वी मोसमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आज सकाळपासूनच राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यावेळी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, रायगड, रत्नागिरी, मुंबई, जळगाव, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांमध्येही विजाच्यां कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तववण्यात आली आहे.