बुलढाणा : यंदाच्या उन्हाळा चांगलाच तापत आहे. तापमान चाळीस अंशावर वाटचाल करीत असताना उद्या गुरुवारी (२०मार्च) पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.सध्या दंगलीने तापलेल्या नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने हा अंदाज वर्तविला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर प्राप्त हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात उद्या २० मार्च रोजी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आला आहे.
एवढेच नव्हे तर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गतच्या येथील कृषी विज्ञान केंद्राने ही माहिती दिली. येथील शास्त्रज्ञ मनेश यदुलवार यांनी वादळी वाऱ्याची व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. डॉ. यदुलवार यांनी जिल्ह्यातील शेतकरी आणि पशुपालक यांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. कापणी, मळणी केलेला शेतमाल ताबडतोब सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, जनावरांना खराब हवामान परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे अशी सूचना त्यांनी दिली आहे.
ढगाळ वातावरण
हा अंदाज काहीसा अचूक ठरण्याची चिन्हे आज बुधवारी, १९ मार्च रोजी दिसून आली. आज दुपारपासूनच बुलढाणा शहरासह जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाल्याचे दिसून आले. सध्या बुलढाण्यासह घाटावरील सहा तालुक्यात कमाल तापमान ३७ ते ३८ डिग्री सेलसियस तर घाटा खालील सात तालुक्यातील कमाल तापमान ४० डिग्री च्या आसपास रेंगाळत आहे. उद्योग नगरी खामगाव शहरातील तापमान ४१ डिग्रीच्या आसपास आहे. आज दुपारपासून असलेल्या ढगाळ वातावरण मुळे तापमानात घाट होण्याची शक्यता आहे. यात उन्हाळा चांगलाच तापत असताना उद्या गुरुवारी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.