लोकसत्ता टीम

अमरावती : अमरावतीसह विदर्भातील अनेक सार्वजनिक मंदिर ट्रस्टच्या जमिनी काही महसूल अधिकारी, भूमाफियांच्या संगनमताने हडपण्याचे प्रकार सुरू असून या विरोधात महाराष्ट्र सरकारने ‘ॲन्टी लँड ग्रॅबिंग’ कायदा करावा, मंदिर सुरक्षा, मंदिर समन्वय आणि देशभरातील सरकारीकरण झालेली मंदिरे सरकारमुक्त करावी, अशी मागणी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय सचिव सुनील घनवट यांनी केली आहे.

तिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र जहांगीरपूर येथे आयोजित महाराष्ट्र मंदिर न्यास अमरावती विदर्भ प्रांत अधिवेशनात आठ ठराव पारित करण्यात आले. त्यावेळी बोलताना घनवट यांनी मंदिर संस्थान हे बळकट आणि सुरक्षित व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सुनील घनवट म्हणाले, अनेक ठिकाणी मंदिराच्या जमिनी हडपणाऱ्या बिल्डर लॉबी, भूमाफिया यांच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली नाही. कोकणात मंदिरांच्या सहस्त्र एकर जमिनीचे सातबाऱ्यावरील नाव शासनाने मंदिर विश्वस्तांना विश्वासात न घेता परस्पर बदलून शासनाच्या नावे करून घेतले आहे. असे प्रकार राज्यात अनेक ठिकाणी झाले आहेत. त्या सगळ्या जमिनी देवस्थानच्या नावावर कराव्यात, अशी आमची मागणी आहे.

मंदिरांची संपत्ती ही मंदिराकडे सुरक्षित राहावी, यासाठी गुजरात, कर्नाटक, आसाम, ओडिया या राज्यांमध्ये ‘अँटी लँड ग्रेबिंग ऍक्ट’ लागू झाला आहे, तो महाराष्ट्रातही व्हायला हवा. मंदिरांच्या सुरक्षेसाठी हा महत्त्वाचा कायदा इतर राज्यात लागू होऊ शकतो, मग महाराष्ट्रात काय अडचण आहे, असा सवालदेखील सुनील घनवट यांनी उपस्थित केला. देशभरात एकूण साडेचार लाख देवस्थाने ही सरकारच्या ताब्यात आहेत. ही सर्व देवस्थाने सरकार नियंत्रणमुक्त होऊन भक्तांच्या ताब्यात असायला हवीत, हा अधिवेशनाचा प्रमुख उद्देश आहे, असे घनवट यांनी सांगितले.

मंदिरांचे व्यवस्थापन सरकारने मुक्त करावे, मंदिराची संपत्ती विकासासाठी वापरण्यास मनाई, धर्मादाय आयुक्त कार्यालयाची नियमबाह्य पत्रे थांबवावीत, पौराणिक मंदिरांचा जीणोद्धार करण्यासाठी निधी द्यावा, इस्लामी अतिक्रमणे हटवावीत, मंदिरे आणि तीर्थक्षेत्र स्थळी मद्य व मांस विक्रीला बंदी, पुजाऱ्यांना मानधन देण्याची व्यवस्था करावी, असे आठ ठराव यावेळी पारित करण्यात आले.

मंदिर न्यास अधिवेशनाला रांजणगाव गणपती मंदिराचे उपाध्यक्ष संदीप दौंडकर, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय सचिव जनार्दन बोथे गुरुजी, वरूड येथील कैलाश आश्रमाचे महंत वासुदेवानंद महाराज, धामंत्री येथील श्रीनागेश्वर महादेव संस्थांचे अध्यक्ष कैलास पोनालिया, जहागीरपूर येथील महारुद्र हनुमान मंदिराचे अध्यक्ष ओमप्रकाश परतानी आणि पिंगळादेवी संस्थान, सनातन संस्थेचे अशोक पात्रीकर आदी उपस्थित होते.

Story img Loader