यवतमाळ : अयोध्येत राम मंदिरात आज सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी यवतमाळ शहरातही जय्यत तयारी करण्यात आली आहे. या निमित्त शहरात चौकाचौकांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात सर्वत्र भगव्या पताका लावण्यात आल्या आहेत.

शहरातील मंदिरात सजावट व रोषणाई करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी महाआरती केली जाणार आहे. अवघे शहर राममय झाले असून हा सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा होत आहे. श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा दिवाळीसारखा साजरा करण्याचे आवाहन करण्यात आल्यामुळे अनेकांनी मंदिरांची, घरांची स्वच्छता, साफसफाई केली आहे. मंदिरांवर आणि घरांवर विद्युत रोषणाई केली आहे.

हेही वाचा – रामाचे अस्तित्व नाकारणाऱ्यांना उत्तर देणार नाही; फडणवीस

उत्सवामुळे शहरातील मंदिरे ही राममय झाली आहेत. मंदिरात आज सोमवारी दिवसभर कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. सुंदर कांड, रामरक्षा, मंदिर सजावट, दिव्यांची आरास, कारसेवकांचा गौरव, कीर्तन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाजारपेठेतदेखील राममंदिराच्या प्रतिकृतीसह विविध वस्तू, श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमानाच्या प्रतिमा, झेंडे, तोरण, कापडी झेंडे, मफलर, टोपी, स्टिकर अशा वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. शहरातील चौकाचौकांत विविध कार्यक्रमांसह प्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले आहे. अतिषबाजीसाठी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली आहे.

हेही वाचा – Ram Mandir Ayodhya Inauguration Live: “मोदींनी कधीच प्रभू श्रीराम यांच्या तत्त्वांंचं पालन केलेलं नाही”, भाजपा नेत्याची परखड टीका!

शहरातील तिवारी चौकातील श्रीराम मंदिरात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात कारसेवकांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची महाआरती होणार आहे. तसेच मंदिरात दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सर्व समाज बांधवांनी घरी दीपोत्सव साजरा करावा, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे. येथील श्री बालाजी देवस्थान तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात रविवारी रात्री पाच हजार पणत्या पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

हेही वाचा – नैसर्गिक आपत्ती, नापिकी, शेतमालाचे पडलेले भाव अन् कर्जाचा बोझा; वाशीमच्या बेलखेडातील शेतकरी पुत्राची आत्महत्या

हा उत्सव संपूर्ण जिल्ह्यात आनंदात, हर्षोल्हासात साजरा व्हावा, याकरता संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षक, नऊ उपविभागीय पोलीस अधिकारी, २३ पोलीस निरीक्षक, ११९ सहायक पोलीस निरीक्षक-पोलीस उपनिरीक्षक, ९०५ अंमलदार, ४५ नवप्रविष्ठ अंमलदार, क्यूआरटीचे दोन पथक, आरसीपीचे ४ पथक, असे एकूण १ हजार ५८ अंमलदार आणि ७०० होमगार्ड असा बंदोबस्त तैनात आहे.

अयोध्या येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा लोकार्पण सोहळानिमित्ताने नागरिकांनी विविध धार्मिक कार्यक्रम शांततेत साजरे करावे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोणीही समाज विघातक कृत्य केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी दिला आहे.

Story img Loader