अमरावती : शहरातील इर्विन चौक ते राजापेठ या उड्डाणपुलावर सांधे जोडण्याच्या ठिकाणी तीन इंचाच्या भेगा आढळून आल्याने या पुलावरील वाहतूक गुरुवारी मध्यरात्रीनंतर बंद करण्यात आली आहे. शहरातील मुख्य मार्गावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. या पुलावर तडे गेल्याचे गुरुवारी रात्री काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती वाहतूक पोलिसांना दिली. या उड्डाणपुलावर चार ते पाच ठिकाणी भेगांमधील अंतर वाढल्याचे दिसून आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन शाखेने या प्रकाराची लगेच दखल घेत खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला. रात्री महापालिकेच्या अभियंत्यांकडून तपासणी करण्यात आली असून, शुक्रवारी तज्ज्ञांच्या चमूकडून तपासणी केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आपत्ती व्यवस्थापन शाखेने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – गोंदिया : ट्रकने मुलाला चिरडले, संतप्त जमावाने ट्रक पेटवला; परिसरात तणाव
हेही वाचा – राजकीय नेत्यांचे वक्तव्य अज्ञानातून, न्यायालयाच्या ताशेऱ्यांवर फडणवीसांची प्रतिक्रिया
वाहतूक पोलिसांनी मध्यरात्रीनंतर उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी कठडे लावून या मार्गावरील वाहतूक बंद केली. स्लॅब टाकून या पुलाची बांधणी करण्यात आली आहे. पुलाच्या सांधे जोडणीसाठी तांत्रिकदृष्ट्या एक इंचाची जागा ठेवण्यात येते. या भेगांमधील अंतर वाढले असून भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुलावर अनेक ठिकाणी या भेगांमधील अंतर तीन इंचापर्यंत वाढल्याने वाहनचालकांना पुलावरून जाताना अडथळा निर्माण झाला. गुरुवारी रात्री त्याची तीव्रता जाणवल्यानंतर लोकांनी प्रशासनाला ही माहिती दिली. गुरुवारी रात्री या उड्डाणपुलाखालून श्रीराम जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित मिरवणूक गेली. मिरवणुकीत हजारो नागरिक सहभागी झाले होते.