लोकसत्ता टीम
चंद्रपूर: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या….अशी भक्तांची भावनिक साद. टाळ, मृदंग, ढोल ताशा, डीजे च्या तालावर थिरकत मंजुळ स्वरांचा निनाद, गुलालाची उधळण उधळण करीत मंगलमय आरती अशा भावनिक वातावरणात भक्तांनी श्री गणपती बाप्पाला निरोप दिला. येथील दाताला मार्गावरील ईरइ नदीच्या पात्रात तर रामाला तलाव येथे कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जनाने दहा दिवसीय गणपती उत्सवाची सांगता झाली.
अनंत चतुर्थीच्या दिवशी सकाळी १० वाजता पासून घरगुती गणेश विसर्जन सुरू झाले. तर दुपारी १२ वाजता पासून सार्वजनिक गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळाने गांधी चौक या मुख्य मार्गाने निघालेल्या मिरवणुकीत सहभागी झाले. विठ्ठल मंदिर वॉर्ड गणेश मंडळाचे देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. चांद्रयान मोहीम, मलखाम, लेझिम पथक, मोबाईल अती वापराचे परिणाम, भूकबळी , शेतकरी आत्महत्या पासून तर दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय यावर देखावे होते. गंज वॉर्ड गणेश मंडळ, हिवरपुरी गणेश मंडळ, जोड देऊळ गणेश मंडळ यांनी आकर्षक देखावे तयार केले होते. देखाव्यांवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तथा चांद्रयान मोहीम याची छाप होती.
आणखी वाचा-…तर पोलीस ठाण्यासमोर थाटणार वरळी-मटक्याचे दुकान!
शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा देखावा सर्वाधिक लक्ष वेधून घेत होता. आकर्षक गणेश मूर्ती सजविलेल्या ट्रक वर भक्तांचे लक्ष वेधून घेत होती. गणपतीला अखेरचा निरोप देण्यासाठी गांधी चौक ते जटपुरा गेट या मार्गावर भक्तांची अलोट गर्दी उसळली होती. गांधी चौक येथे काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया, राहुल पुगलिया यांनी गणेश मंडळाचे स्वागत केले. आमदार किशोर जोरगेवार यांनी गणेश मंडळाच्या अध्यक्ष सचिवांचा स्वागत व सन्मान केला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकमान्य टिळक विद्यालय समोर तर शहर काँग्रेस समितीच्या वतीने आमदार प्रतिभा धानोरकर, रामु तिवारी यांनी आझाद बगीचा जवळ गणेश मंडळाचे स्वागत केले.
शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, मनसे तथा इतर विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना तथा स्वयंसेवक कार्यकर्ते यांनी भक्तांसाठी मसाला भात, पुरी भाजी, आईस्क्रीम, चहा, सरबत पासून पिण्याच्या पाण्यापर्यंत सर्व व्यवस्था केली होती. मोहित मोबाईल व कॅटरिंग असो. ने भक्तांना मसाला भात वितरीत केला. अतिशय शांततेत गणेश विसर्जन पार पडले. जटपुरा गेट येथे शांतता समितीद्वारे गणपती मंडळाचे स्वागत करण्यात आले..चंद्रपूर मनपा स्वछता विभागाद्वारे श्री गणेश मिरवणूक दरम्यान स्वछता करण्याचे काम सुरू करण्यात आले असून सकाळी सहा वाजेपर्यंत शहराचे रस्ते स्वच करण्यात मनपा सफाई कर्मचाऱ्यांचे फार मोठे योगदान आहे. तर गणेश विसर्जनासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार न घडता विसर्जन शांततेत पार पडले.