चंद्रपूर : एखाद्याला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यास अनेकजण कामाच्या व्यापात विसरून जातात. सेलिब्रेटीच्या बाबतीत हा प्रकार नेहमीच होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. मात्र ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अलीझंझा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके आणि स्कूल बॅग भेट स्वरूपात देण्याचे अभिवचन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व पत्नी अंजली यांनी दिले होते. दोन महिन्यानंतर ताडोबातील अलीझंझा शाळेला आठवणीने भेट देताना तेंडुलकर दाम्पत्याने दिलेल्या वचनाची पूर्तता केली आहे. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूकडून ही भेट स्वीकारताना शाळेचे विद्यार्थी देखील गहिवरले. हा भावनिक प्रसंग आज ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अलीझंझा शाळेत उपस्थित असलेल्या सर्वांनी याची देही याची डोळा अनुभवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> एकाच कुटुंबातील तिघांकडून ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ सर; अकोल्यातील गिर्यारोहकांकडून मोहीम फत्ते

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दोन महिन्यांपूर्वी २१ फेब्रुवारी रोजी पत्नी अंजली व मित्रांसमवेत ताडोबात व्याघ्र सफारीसाठी आला असता अलीझंझा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली होती. तेव्हा विद्यार्थ्यांनी चौथ्या वर्गाच्या मराठीच्या पुस्तकात असलेला कोलाज नावाचा धडा सचिनची बायोग्राफी वाचून दाखवली होती. स्वत:ची बायोग्राफी विद्यार्थी वाचत असताना सचिन भावूक झाला होता. तेव्हा सचिनची पत्नी डॉ. अंजली हिने शाळेतील विद्यार्थांना गणवेश, स्कूल बॅग देण्याचे कबूल केले होते. विद्यार्थ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीने शुक्रवारी दुपारी ३ वाजता अलीझंझाच्या जि. प. शाळेत सचिन व पत्नी डॉ. अंजली व मित्र यांनी दोन महिन्यानंतर भेट देत विद्यार्थ्यास स्कूल बॅग दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

सचिन विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी येणार असल्याने विद्यार्थी व शिक्षकाने शाळेत रांगोळी व फुलांनी सजवली होती. सचिन शाळेत येताच शाळेतील विद्यार्थिनी व शिक्षिका मनीषा बावणकर यांनी पारंपरिक पद्धतीने लाकडी पाटावर पाय धुतले व औक्षवण करत पुष्पगुच्छ दिले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून अलीझंझा गाव आहे. गावाची लोकसंख्या ३०० च्या घरात आहे. गेटकडे जाण्याच्या मार्गावर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत सध्या सतरा विद्यार्थी आहेत.

हेही वाचा >>> बुलढाणा : हे गाव लय भारी; येथील सर्वसमावेशक जयंतीच न्यारी! बुद्ध जयंती मध्येही सर्वधर्मीयांचा सहभाग

फेब्रुवारी महिन्यात याच मार्गाने सफारी ला जाताना विद्यार्थी खेळताना सचिनला दिसले. त्यांनी गाडी थांबवून शाळेला भेट दिली होती. दरम्यान, विद्यार्थ्यांनी सचिनच्या जीवन चरित्रावर आधारित चौथ्या वर्गाच्या मराठीच्या पुस्तकात असलेला कोलाज नावाचा धडा वाचून दाखवला होता. शुक्रवारी याची आठवण करत सचिनने पुन्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्कूल बॅग व साहित्य भेट दिली. बॅग मध्ये काही साहित्य आहे बॅग आणि साहित्याचा वापर शाळेसाठी करा बरोबर करा असे सांगत खूप शिका असे बोलले. लगेच पंधरा मिनिटानी अलीझंझा गेटमधून सफारीला निघाले. दरम्यान. जि. प. प्राथमिक शाळेने छोटेखानी कार्यक्रम ठेवला होता. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रमेश बदके, संचालन देविदास बावणकर, शिक्षिका मनीषा बावनकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर चौखे, सरपंच गजानन वाकडे, मुख्याध्यापक अशोक कामडी, ग्रा. प. सदस्या सुनीता नन्नावरे, शाळा व्यवस्थापक समिती सदस्या वैशाली नागोसे, विशेष शिक्षक रवींद्र उरकुडे, वनरक्षक परमेश्वर अनकाडे आदी उपस्थित होते.

छोटी ताराचे दर्शन

सचिन तेंडुलकर गुरुवारी दुपारपासून तालुक्यातील बांबू रिसोर्ट मध्ये पत्नी डॉ. अंजली आणि मित्रासोबत वाघाच्या भेटीला मुक्कामी आहेत. गुरुवारी कोलारा कोअर गेटमधून सफारी केली. तर शुक्रवारी सकाळी सचिन व परिवाराने कोलारा कोअर गेटमधून सफारी केली. यावेळी सचिनला छोटी तारा व दोन अस्वलाचे दर्शन झाले. सचिनची या वर्षातील दोन महिन्यानंतर दुसरी फेरी आहे. सचिनचा ७ मे पर्यत मुक्काम आहे. बुद्ध पौर्णिमेला रात्री प्राणी व व्याघ्रगनणा केली जाते. त्यामुळे सचिन प्रत्यक्ष या वाघ्रगणनेत सहभागी होते किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अविस्मरणीय क्षण आपल्या शाळेला सचिन तेंडुलकर भेट देऊन स्कूल बॅग देणार असल्याचे शिक्षकांच्या मार्फत विद्यार्थ्यांना सकाळी कळले होते. त्यामुळे विद्यार्थी आनंदित होते. सचिन तेंडुलकरने शाळेत प्रवेश केला तेव्हा विद्यार्थ्यांनी संवाद साधत सचिनला गराडा घातला. सचिनने प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या हाताने स्कूल बॅग दिली तेव्हा विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. सचिनने शाळेला दुसऱ्यांदा व्हिजीट देण्याचा हा अविस्मरणीय क्षण असून शाळेच्या इतिहासात कधीही न विसरणारा क्षण असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tendulkar couple gift uniforms school bags and books to school students in tadoba rsj 74 zws