लोकसत्ता टीम
नागपूर : प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर नागपुरात रामभक्तांनी तहसील-महाल-कोतवाली परिसरातून मिरवणूक काढली. मात्र, मोमीनपुरा चौकात मिरवणूक आल्यानंतर आतील भागातून मिरवणूक काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, एका गटातील नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी मज्जाव केला. त्यामुळे चौकात मोठा तणाव निर्माण झाला. पोलीस आयुक्त स्वत: पोहचले आणि अतिरिक्त कुमक बोलावल्यानंतर तणाव निवळला गेला, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
सोमवारी दुपारी रामभक्तांनी ‘जय श्रीराम’ असे नारे देत पोद्दारेश्वर मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढली. दुपारी तीन वाजता मिरवणूक मोमीनपुऱ्यात आली. तेथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. मिरवणूक मोमीनपुऱ्याच्या आतील रस्त्याने नेण्यात येणार होती. मात्र, एका गटाने त्याला विरोध दर्शविला. पोलिसांनीही मध्यस्थी करीत अग्रसेन चौक ते मेयो चौकातून मिरवणूक नेण्यास सांगितले. त्यामुळे चौकातच मोठा तणाव निर्माण झाला. आमदार प्रवीण दटके यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन रामभक्तांना शांत केले. दरम्यान, तणावाची स्थिती बघता पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वत: मोमीनपुरा चौकात पोहचले. त्यांनी मोठा ताफा बोलावून घेतला. आ. दटके यांच्याशी पोलीस आयुक्तांनी चर्चा केली. त्यामुळे तणाव निवळला.
आणखी वाचा-करोनाच्या नावावर मागितला ‘पॅरोल’, न्यायालय म्हणाले, ‘आता कुठाय करोना…?
अग्रेसन चौकापासून रस्ता बंद
तणाव निर्माण झाल्याचे कळताच पोलिसांनी लगेच अग्रेसन चौकात बॅरीकेड्स लावून रस्ता बंद केला. पोलिसांचा मोठा ताफा अग्रेसन चौकात तैनात करण्यात आला. जवळपास ५ तासांपर्यंत अग्रसेन ते मेयो या रस्त्यावर एकही वाहन आणि व्यक्तींना सोडण्यात आले नाही. त्यामुळे अनेकांनी पोलिसांशी वाद घातले तर काहींना अक्षरशः दंडुक्याच्या धाक दाखवून पोलीस पिटाळत होते. पोलिसांचा गोपनीय विभाग पूर्णपणे अपयशी ठरला असून माहिती जाळे विस्कटल्याचे चित्र दिसत होते.
आणखी वाचा-नागपूर : फोन करण्यास परवानगी न मिळाल्याने कैदी थेट न्यायालयात…
अफवांवर विश्वास ठेवू नका- पोलीस आयुक्त
मोमीनपुरा चौकात तणाव निर्माण झाला होता. दोन्ही समुदायाच्या लोकांनी पोलिसांना सहकार्य केले. येथे कोणतीही आपत्तीजनक घटना घडली नाही. तणाव निवळल्या गेला. सध्या शांतता असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.