लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : कार्यकाळ संपल्यामुळे आणि निवडणुकांबाबत अनिश्चितता असल्याने दोन वर्षापूर्वी महापालिका आणि आता जिल्हा परिषद व सर्व पंचायत समित्यांवर प्रशासकाची नियुक्ती करून स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रशासक नियुक्तीचे वर्तुळ शासनाने पूर्ण केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राजकीय नेतृत्व घडते. त्यामुळे या संस्थामध्ये लोकशाही पद्धतीने कामकाज होणे अपेक्षित आहे. दोन वर्षापूर्वी कार्यकाळ संपल्याने नागपूर महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता याच कारणामुळे जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. नागपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ १७ तारखेला पूर्ण होणार असल्याने तेथे शुक्रवारपासून प्रशासकीय राजवट लागू होईल. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व १३ पंचायत समित्यांवर मात्र त्यांचा कार्यकाळ सपुष्टात आल्याने गुरुवारी प्रशासक नियुक्त करण्यात आला.

आणखी वाचा-वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड

राज्य शासनाने बुधवारी सहा जिल्हा परिषद व ४४ पंचायत समित्यांवरील प्रशासक नियुक्तीचे आदेश प्रसिद्ध केले. नागपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ १७ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे तेथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रशासकाची सूत्रे जातील. जिल्ह्यातील काटोल, कामठी, रामटेक, हिंगणा, कुही, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, पारशिवनी, नागपूर ग्रामीण मौदा या १३ पंचायत समित्यांचा कार्यकाळ १६ जानेवारीला संपुष्टात आला असल्याने तेथे गुरुवारपासून प्रशासकाची रााजवट सुरू झाली. खंडविकास अधिकारी या पंचायत समित्यांचे प्रशासक असतील.

नागपूर जिल्हा परिषदेने त्यांना मुदतवाढ मिळावी म्हणून ठराव पारित केला होता. त्याला विरोधी पक्षातील भाजपने पाठिंबा दिला होता. मात्र यापूर्वी जि.प.वर भाजपची सत्ता असताना तत्कालीन युती सरकारने त्याला मुदतवाढ दिली होती. मात्र न्यायालयाने ती बेकायदेशीर ठरवली होती. त्यामुळे आताच्या जि.प.पदाधिकाऱ्यांनी पाठवलेला ठराव शासनाने कचरा कुंडीत टाकला. सध्या महापालिकेत मागील दोन वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवरही प्रशासक नियुक्त होणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्व सूत्रे राज्य सरकारकडे जाणार आहेत.

आणखी वाचा-वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू, एकाचा जीवनमरणाचा संघर्ष…

महाराष्ट्र शासनाने १ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम कायदा समत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्राम पंचायत अशा रितीने त्रिस्तरिय पंचायत राज ची स्थापना केली. सध्या नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायतस्तरावरच पंचायती राज आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिकेवर प्रशासकीय राजवट आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Term of nagpur zilla parishad will end on 17th january and administrative rule will be imposed from friday cwb 76 mrj