गडचिरोली : अत्याचार पीडित पाच वर्षांच्या चिमुकलीची उपचाराअभावी हेळसांड झाल्याप्रकरणी ‘लोकसत्ता’ने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी १३ मार्चला मोठी कारवाई केली. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम जारावंडीत कार्यरत तीन मानसेवी डॉक्टरांना त्यांनी निलंबित केले तर जारावंडीत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी राहावा, यासाठी तेथे नियुक्त असलेले वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. लोकेशकुमार कोटवार यांच्याकडील जिल्हा हिवताप अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार काढून घेण्यासाठी उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे पाच वर्षांच्या बालिकेशी आरोग्य केंद्राच्या शिपायाने कुकर्म केल्याचा घृणास्पद प्रकार ९ मार्चला समोर आला होता. पीडितेला घेऊन नातेवाईक जारावंडी आरोग्य केंद्रात गेले असता तेथे एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना पेंढरी गाठावे लागले. पेंढरीतील आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करुन त्यांनी नंतर गडचिरोली गाठले. प्रकृती अत्यवस्थ झाल्याने पीडितेला नागपूरला हलवावे लागले. दरम्यान, या प्रकरणानंतर अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवेची विदारक स्थिती चव्हाट्यावर आली. ११ मार्चला मोर्चा काढून संतप्त नागरिकांनी आरोग्य केंद्रास टाळे लावले होते.

हेही वाचा – राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…

१२ मार्चला खुद्द जि.प. ‘सीईओ’ आयुषी सिंह यांनी तेथे भेट देऊन स्थानिकांना विश्वास देत कुलूप उघडले व आरोग्य सेवा पूर्ववत केली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांच्याकडून अहवाल मागवला. त्यानंतर जारावंडी येथे मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त असलेले डॉ. अर्चना हिरेखण, डॉ. जागृती गावडे व डॉ. राकेश हिरेखण यांची सेवासमाप्ती करण्याचे आदेश आयुषी सिंह यांनी जारी केले. मुख्यालयी गैरहजर राहून पीडितेवर उपचारात हलगर्जी केल्याचा या सर्वांवर ठपका आहे. यासोबतच डॉ. राकेश हिरेखण यांच्यावर नागरिकांना उद्धट वागणूक देत असल्याचाही आरोप आहे. या कारवाईने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – खबरदार! लोकसभेसाठी खर्च ९५ लाखांवर गेला तर…, उमेदवारांवर यंत्रणांचे राहणार लक्ष

उपसंचालकांना प्रस्ताव

जारावंडीत नेमणुकीस असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. लोकेशकुमार कोटवार यांच्याकडे जिल्हा हिवताप अधिकारीपदाचाही अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे त्यांचे मूळ नेमणुकीच्या ठिकाणी दुर्लक्ष झाले. याकरता नियमित जिल्हा हिवताप अधिकारी नियुक्त करावा. जेणेकरुन डॉ. लोकेशकुमार कोटवार यांना मूळ पदभार असलेल्या जारावंडीत पूर्णवेळ सेवा देता येईल, असा प्रस्ताव जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी आरोग्य उपसंचालकांना पाठवला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Termination of three doctors for dereliction of duty jaravandi sexual assault case ssp 89 ssb