नागपूर : साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या मायलेकीसह तिघांचा अपघातात मृत्यू झाला. मागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही दुर्दैवी घटना बुटीबोरी ठाण्यांतर्गत नागपूर-चंद्रपूर महामार्गावर जंगेश्वर गावाजवळ सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. सुचिता सुधीर दांडेकर (४०), खुशी उर्फ समृद्धी सुधीर दांडेकर (१६) रा. हिंगणघाट, वर्धा आणि पुणीराम येनूरकर (६०) रा. गिरड, अशी मृतांची नावे आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणीराम यांच्या नातेवाईकाकडे रविवारी साखरपुड्याचा कार्यक्रम होता. यात सहभागी होण्यासाठी ते मुलगी सुचिता आणि नात खुशी हिच्यासह नागपूरला आले होते. साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून सोमवारी सकाळी तिघेही एमएच-३२/एएम-१९९६ क्रमांकाच्या दुचाकीने गिरडला जाण्यासाठी निघाले. नागपूर-चंद्रपूर महामार्गाने बुटीबोरी परिसरातून जात असताना जंगेश्वर गावाजवळ मागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. तिघेही उसळून खाली पडले. त्याच दरम्यान वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने पुणीराम यांचा जागीच मृत्यू झाला. सुचिता आणि खुशी ही गंभीर जखमी झाल्या. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती पोलिसांना देऊन जखमी मायलेकीला बुटीबोरीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान दोघींचाही मृत्यू झाला.
हेही वाचा >>>यवतमाळ : सिमेंट स्टील गोदामात दरोडा; रखवालदाराची निर्घृण हत्या
अपघाताची माहिती मिळताच बुटीबोरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून तिनही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयात रवाना करण्यात आले. पोलिसांनी पुणीराम यांचा मुलगा अमित येनूरकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.