अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अरण्यानजीक वसलेल्या आदिवासींच्या वस्त्यांमध्ये कधी वाघाचा तर कधी बिबट्याचा शिरकाव झाल्याच्या घटना अनेकदा समोर येतात. मात्र आता जंगलात लाकडे तोडण्‍यासाठी गेलेल्‍या आदिवासी व्‍यक्‍तीवर दबा धरून बसलेल्‍या वाघाने हल्‍ला केला. यात त्‍याचा घटनास्‍थळीच मृत्‍यू झाला. हरीसाल नजीक ३ नोव्‍हेंबर रोजी भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हरीराम गंगाराम धिकार (रा. केसरपूर) असे मृताचे नाव आहे. हरीराम हा गावकऱ्यांसोबत जंगलात लाकडे तोडण्‍यासाठी गेला होता. हरीसालपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर जंगलात अचानकपणे वाघाने हरीरामवर हल्‍ला चढवला. त्‍यानंतर वाघाने त्‍याला ओढत दूरवर नेले. त्‍याच्‍यासोबत असलेले लोक कसेबसे आपला जीव वाचवून गावात पळाले. त्‍यांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली. अनेकांनी जंगलाकडे धाव घेतली. आमदार राजकुमार पटेल हे देखील घटनास्‍थळी पोहचले. त्‍यांच्‍यासमवेत सरपंच विजय दारसिंबे, उपसरपंच गणपत गायन आणि इतरही गावकरी होते.

हेही वाचा >>> ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

या घटनेमुळे गावकऱ्यांमध्‍ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मेळघाटात मानव-वन्‍यजीव संघर्षाच्‍या घटना कमी प्रमाणात आहेत. मेळघाट व्‍याघ्र प्रकल्‍पाचा विस्‍तार मोठा आहे, पण गेल्‍या वर्षीही अशाच  प्रकारची घटना घडली होती.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागातील माताकोल संरक्षण कॅम्‍पनजीक कारा येथील एका युवकावर वाघाने हल्ला केल्‍याची घटना गेल्‍या वर्षी जूनमध्‍ये घडली होती. या युवकाला वाघाने फरफटत दरीत ओढून नेले होते. राजेश रतिराम कास्‍देकर (२८, रा. कारा) असे मृत युवकाचे नाव होते.

हेही वाचा >>> राज्यातील दीडशेवर कैद्यांची होणार कारागृहातून सुटका; नागपूर आणि पुण्यातील…

निस्ताराचे बांबू तोडण्यासाठी कारा येथील भुरेलाल कासदेकर, सुखलाल धांडे आणि राजेश कासदेकर हे तीन मजूर माताकोल संरक्षण कॅम्‍प परिसरात गेले होते. सोमवारी दुपारी त्यांच्यावर वाघाने हल्ला चढविला व राजेशला दरीत ओढून नेले. भुरेलाल कास्देकर, सुखलाल धांडे हे घाबरून एका झाडावर चढल्यामुळे त्यांचे प्राण वाचले होते. 

वनविभागाचे दुर्लक्ष गुगामल वन्‍यजीव विभागात ज्‍या ठिकाणी ही घटना घडली, तेथील वनरक्षकाकडे पाच कर्मचाऱ्यांचा पदभार असून वनपरिक्षेत्र अधिकारी देखील सुटीवर असल्‍याने हा संपूर्ण परिसर वाऱ्यावर सोडून देण्‍यात आला आहे. वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेऊन मानव-वन्‍यजीव संघर्ष टाळण्‍यासाठी वेळीच उपाययोजना करावी अशी मागणी ‘वॉर’ या वन्‍यजीव संरक्षण क्षेत्रात कार्यरत संस्‍थेचे अध्‍यक्ष नीलेश कांचनपुरे यांनी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terror among the villagers after tiger kills man in melghat mma 73 zws