गोंदिया: पुणे येथे अटक झालेल्या दहशतवाद्यांच्या माहितीत गोंदियातील अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३५, रा. महकनाज, कान्हरटोली, हनुमान मंदिराजवळ, बापट लॉन गोंदिया) हा तरुण पुणे दहशतवाद्यांच्या सोबत कार्य करीत असल्याचे पुढे आल्यानंतर पुणे येथील दहशतवादी विरोधी मोहिमेच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून कसून चौकशीसाठी त्याला ३० जुलै रोजी पुन्हा गोंदियात आणण्यात आले. त्याची कसून चौकशी करून त्याच्या संगणकातील मोठ्या प्रमाणात डाटा एटीएसची चमू घेऊन गेली आहे. तो पुण्यातील तबलीग जमात मस्का येथील कार्यकर्ता असल्याचे तपासातून पुढे आले आहे.
गोंदिया व गोरेगाव येथे पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या कादीर दस्तगीर पठाण (वय ३५) याला दोन भाऊ व आई असून ते गोविंदपूर येथे राहतात. त्याने आपल्या आत्यासोबतच विवाह केल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला घराबाहेर काढले. तो कन्हारटोली येथे सासरी राहू लागला. १२ वर्षांपूर्वी तो नोकरीच्या शोधात पुणे येथे गेला. तिथे त्याने ग्राफिक डिझायनर म्हणून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केले. सहा वर्षांपूर्वी त्याने पुण्याचा फैदाने मदिना मस्क, ब्राइट फ्युचर स्कूलसमोर पुणे हा परिसर गाठला. त्या ठिकाणी तो राहू लागला. तो आधी सुन्नी पंथाचे अनुसरण करीत होता; परंतु पुण्यात आल्यावर अहले-हदीसचे अनुसरण करू लागला.
हेही वाचा… डॉ. भैरवी काळे यांना आकाशवाणीची ‘ए’ श्रेणी प्राप्त; विदर्भातील एकमेव…
पुण्यातील तबलीग जमात मस्का येथे त्यांच्या संवाद व वागण्यामुळे कादीर त्यांच्याकडे आकर्षित झाल्याची माहिती त्याने चौकशी करणाऱ्या यंत्रणेला दिली. ३० जुलै रोजी गोंदियात पुणे येथील एटीएसचे चार अधिकारी दाखल झाले होते. त्यांनी पुरावे गोळा करून एकाला आपल्यासोबत चौकशीसाठी नेले. आता त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे समजते. कादीर पठाण याने विविध कंपन्यांकडे काम केले. त्या कंपन्यांत काम करताना त्याने काम शिकले. यूट्यूब व्हिडीओंमधून ग्राफिक डिझायनिंग शिकून तो पुण्यात फ्रीलान्सर ग्राफिक डिझायनर म्हणून काम करू लागला होता.
हेही वाचा… चंद्रपूर: खनिज विकास निधीचे १०८० कोटींचे प्रस्ताव धुळखात पडून, ५५० कोटींचा निधी अखर्चित
पुणे एनआयएने अटक केलेले इम्रान खान आणि मो. युसूफ साकी यांना तो दीड वर्षापूर्वी भेटला. त्यांच्या संवादामुळे तो त्यांच्याकडे आकर्षित झाला. दोघेही त्याला वारंवार भेटू लागले. त्याला आपल्यासोबत ग्राफिक डिझायनिंगचे काम करण्याची ऑफर दिली. ती ऑफर कादीरने स्वीकारली. त्या दोन्ही दहशतवाद्यांना त्याने आपल्या भाड्याच्या घरात ठेवले. त्यांना जेवणासह ५ हजार मासिक वेतन दिले जात असल्याचे आता पर्यंतच्या तपासातून पुढे आले आहे.