वर्धा : नफातोट्याचा विचार न करता वैद्यकीय शिक्षणात गांधीमुल्यांना सर्वाेच्च प्राधान्य देण्याचे धोरण कायम राहील, अशी ग्वाही सेवाग्रामच्या कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे नवनियुक्त अध्यक्ष पी.एल.तापडिया यांनी दिली आहे.महात्मा गांधी आर्युविज्ञान संस्था, नर्सिंग स्कूल, मेळघाट येथे दवाखाना तसेच अन्य उपक्रम कस्तुरबा हेल्थ सोसायटीद्वारे संचालीत होतात. धीरूभाई मेहता यांचे निधन झाल्यानंतर संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा पी. एल. तापडिया यांच्यावर आली आहे. सुत्रे स्वीकारल्यानंतर तापडिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले की १९६६ पासून संस्थेचा आर्थिक सल्लागार म्हणून या संस्थेशी जुळलो. संस्थेचा वैद्यकीय शिक्षणाचा पाया महात्मा गांधींच्या नैतिक मुल्यांना अनुसरून असल्याने संस्था चालविण्याचे मोठे आव्हान असते. याच एकमेव वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना व सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना खादीवस्त्र अनिवार्य आहे.प्रवेश झाला की महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमात १५ दिवस थांबणे बंधनकारक आहे. या १५ दिवसात त्याला आश्रम जीवन पद्धतीचे धडे मिळतात. स्वतःचे कपडे व भांडी धुणे, सफाई करणे, प्रार्थना असे संस्कार होतात. पुढे एक महिना लगतच्या खेड्यात एक महिना वास्तव्य करीत ग्रामीण आरोग्यच्या समस्या समजून घ्याव्या लागतात.
हेही वाचा >>>नागपुरात गडकरींनी अनेक उड्डाणपूल बांधले, पण शहराच्या हृदयस्थानी एक चूक…
संस्थेला केंद्र व राज्य शासनाकडून ७५ टक्के अनुदान मिळत असून खर्चाचा २५ टक्के भार संस्थेला सहन करावा लागतो. हा जवळपास ५५ कोटीचा खर्च रूग्णशूल्क व अन्य माध्यमातून भरून काढण्याचा प्रयत्न होतो. विद्यार्थ्यांकडून कोणतेच शुल्क आकारल्या जात नाही. पदवी किंवा पदव्युत्तरसाठी विविध शुल्क आकारले असते तर जवळपास दोनशे कोटी सहज प्राप्त होवू शकतात. पण ते संस्थेच्या नैतिक मुल्यात बसत नाही. राज्यात केवळ आमच्याच वैद्यकीय महाविद्यालयात जेनेरीक औषधी दिल्या जाते. ग्रामीण भागातील रूग्ण येत असल्याने धान्याच्या मोबदल्यात औषधोपचार देण्याची सुविधा आहे. भविष्यात डायलिसीसचे युनिट व कर्करोग निदान केंद्र स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ते लक्षात घेवून अपघातग्रस्तांसाठी सुसज्ज उपचार केंद्र स्थापन केल्या जाणार आहे.
असाध्य रोगांनी ग्रस्त असलेल्या रूग्णांच्या कुटुंबियांना फोनवरूनच मोफत सल्ला देण्याची सुविधा सुरू होईल. विविध योजना आर्थिक सुविधेनुसार व मुल्ये पाळून अमलात येतील.ऑक्सफोर्ड विद्यापिठाच्या पुस्तकातून भारतातील तीनच वैद्यकीय संस्था उच्च दर्जाचे शिक्षण व नैतिक व्यवहाराच्या कसोटीवर उतरल्याचा दाखला आहे. वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, बंगरूळू येथील सेंट जॉन हॉस्पिटल व आमचे सेवाग्रामचे महात्मा गांधी आर्युविज्ञान संस्था हे आहे. तसेच वैद्यकीय शिक्षणात विद्यार्थी प्राधान्य देत असलेल्या संस्थांमध्ये आमचे महाविद्यालय तिसऱ्या क्रमांकावर आहे, असे तापडिया यांनी नमूद केले.आमची वैचारिक बैठक विद्यार्थी समजून घेत उर्वरित काळात त्याचे पालन करतो. यावेळी संस्था सचिव डॉ.बी.एस.गर्ग, अधिष्ठाता डॉ.ए.के.शुक्ला प्रामुख्याने उपस्थित होते.