नागपूर : भाजपाचे आंदोलन व बावनकुळेंच्या इशाऱ्यानंतर आता शहर व जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज दुपारी ३ वाजता व्हरायटी चौकात निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य योग्यच आहे. भाजपाकडून होत असलेल्या राजकारणाने राज्याला कलंक लागला आहे. त्यामुळे यापुढे उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलने, प्रेतयात्रा असे प्रकार करण्यात आले तर त्याला जशाच तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा माजी खासदार प्रकाश जाधव यांनी दिला. यावेळी जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ऊर्जामंत्री व पालकमंत्री असताना केलेल्या कामात कसा व किती भ्रष्टाचार झाला हे लवकरच पुढे आणण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – आमदार रवी राणा यांना ठार मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल
भाजपाकडून होणाऱ्या आंदोलनाला विरोध नाही. मात्र, आंदोलन व विरोध करण्याची एक पद्धत असते. प्रेतयात्रा काढणे व पोलिसांनी त्यावर बघ्याची भूमिका घेणे हा प्रकारच निषेधार्थ असल्याचे जाधव म्हणाले. बावनकुळेनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपाला उत्तर देताना आमच्या पक्ष प्रमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना बावनकुळेंनी आधी स्वत: किती भ्रष्टाचार केला हे सांगावे. सिमेंट रस्ते, शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत खांबांचा घोटाळा व इतर अनेक घोटाळ्यांचा यात समावेश असल्याचे जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरेंचे विमानतळावरील पोस्टर्स फाडून त्याला काळे फासण्याच्या प्रकाराबद्दल शिवसेनेकडून सोनेगाव पोलीस ठाण्यात भाजयुमोच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली.