शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांनी अलीकडेच एका तरुणाला मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला. ही घटना ताजी असताना आता ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पोलिसांना मारहाण केल्याचं वृत्त समोर आलं आहे. नितीन देशमुखांनी पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडीओही समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या घटनाक्रमानंतर पोलिसांनी नितीन देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आमदार नितीन देशमुख हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी नागपुरातील रवी भवन येथे पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येताच अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आता सत्य…”
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, मंगळवारी (२७ डिसेंबर) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आमदार नितीन देशमुख आपल्या काही सहकाऱ्यांसोबत रविभवन येथे पांढऱ्या रंगाच्या गाडीने आले होते. यावेळी ड्युटीवर असलेले सुरक्षारक्षक येणाऱ्या प्रत्येकाचे पास आणि त्यांच्याजवळील साहित्याची तपासणी करत होते. सुरक्षा रक्षकांनी देशमुख यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांना पास तपासणीसाठी थांबवलं. त्यामुळे नितीन देशमुख यांनी आपला बिल्ला दाखवून हे काय आहे, माहिती आहे का? असे खडसावले. तसेच देशमुख यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.