अकोला : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. अमरावती ‘एसीबी’ने आता पातूर तहसीलदारांना पत्र देऊन आमदार नितीन देशमुख यांच्यासह त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या स्थावर मालमत्तेची कागदपत्रे पाठवण्याची सूचना केली आहे.
अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांची चौकशी सुरू आहे. १७ जानेवारीला त्यांची अमरावती येथे चौकशी करण्यात आली. ‘एसीबी’कडून प्रकरणातील चौकशीला वेग देण्यात आला. आता आ. देशमुख यांच्यासह त्यांचे नातेवाईक पत्नी, मुले, भाऊ, बहीण यांच्या नावावर असलेल्या प्लॉट, शेतीजमीन, घर आदी स्थावर मालमत्तेची कागदपत्रे प्रमाणित करून सत्यप्रत पाठविण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. आ. देशमुख हे मूळचे सस्ती गावातील आहेत. ते पातूर तालुक्यात येत असल्याने पातूर तहसीलदारांमार्फत माहिती मागविण्यात आली.
हेही वाचा >>> संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन
राज्यातील सर्व तहसीलदारांना चौकशीचे आदेश द्यावे – आ. देशमुख
तक्रारीमध्ये माझ्याकडे मुंबई, पुणे येथे मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे फक्त पातूरच काय तर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदारांना माझ्या संपत्तीबाबत चौकशी करण्याचे आदेश द्यावे, असे आमदार नितीन देशमुख म्हणाले.