गोंदिया : ठाकरे गट आणि भाजप, शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये सुरू असलेली शाब्दीक चकमक आता टीपेला पोहोचली आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर जहाल टीका केली जात आहे. भाजपा नेते राम कदम, राणे पिता-पुत्रांकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार अरविंद सावंत यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांवर जोरदार पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका करणारे निलेश राणे, नितेश राणे, राम कदम आणि शिंदे गटातील नेते ‘बिकाऊ औलादी’चे असल्याची जहरी टीका खा. अरविंद सावंत यांनी केली आहे.
हेही वाचा >>> दररोज ३० किलोमीटर सायकलिंग करणाऱ्याला सायकल चालवतानाच हृदयविकाराचा झटका
खा. सावंत आज, बुधवारी शिवगर्जना यात्रेनिमित्त गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. अर्जुनी मोरगाव येथील प्रसन्ना लॉन येथील कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप-शिंदे गटावर टीकेची तोफ डागली. भाजपच्या निलेश राणे यांनी ठाकरे गटावर आणि उद्धव ठाकरेंवर एकेरी शब्दात टीका करताना आधी भाजपातील स्वत:चे स्थान काय, हे पहावे. आ. नितेश राणे हेही आज भाजपाची बाजू घेत आहे. त्यांच्या आणि त्यांच्या वडिलांच्या सर्व फाईल्स वर्तमान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत वाचून दाखवल्या होत्या. ती गोष्ट नितेश राणे यांनी लक्षात ठेवावी. आज स्वतःला शिवसेना समजत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून तर किरण पावसकर यांच्यापर्यंतचे सर्व नेतेमंडळी भुरटी चोरं असल्याची टीका खा. सावंत यांनी यावेळी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख निलेश धुमाळ, गोंदिया जिल्हा प्रमुख शैलेष जायसवाल आदी उपस्थित होते.