गोंदिया : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते, खा. अरविंद सावंत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. निवडणूक आयोग विकला गेला आहे. भाजपाने संविधानाची हत्या केली असून लोकशाही पायदळी तुडवण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत आणि इतर सर्व यंत्रणा सरकारच्या गुलाम झाल्या आहेत. देशात यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. निवडणूक आयोगाचे निर्णय मोदी सरकार घेत आहे, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे.
हेही वाचा >>> अमरावतीत महात्मा गांधींच्या पुतळ्यावर ‘अभाविप’चा झेंडा; काँग्रेसकडून कारवाईची मागणी
शिवगर्जना यात्रेनिमित्त गोंदियात आले असता ते बोलत होते. सावंत पुढे म्हणाले, “यापूर्वीदेखील अनेक राजकीय पक्षात फूट पडल्याचे आपण पाहिले आहे. त्या पक्षाचे चिन्ह गोठवण्यात आले पण दुसऱ्या गटाला देण्यात आले नाही. मात्र, येथे तर २५ लाख प्रतिज्ञापत्र आयोगाला देऊनही चिन्ह आणि नाव दुसऱ्या गटाला देण्याची किमया विकल्या गेलेल्या निवडणुक आयोगाने केली आहे. संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंचे छायाचित्र काढून त्या जागी एकनाथ शिंदे, आनंद दिघे यांचे छायाचित्र लावले असल्याच्या प्रश्नावर सावंत म्हणाले, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आम्हाला वेगळे कार्यालय दिले आहे. त्यात आम्ही हे छायाचित्र लावू.
फडणवीस फसवणूक करत असल्याचे सिद्ध
गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील ८ गावांनी शेजारील मध्यप्रदेशात विलीनिकरणाची मागणी केली आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भाची फसवणूक करत असल्याचे सिद्ध होते. फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होते, मात्र त्यांनी आमगाव नगरपरिषदेचे भवितव्य ठरवले नाही. त्यामुळे या ८ गावांची स्थिती अनाथासारखी झाली आहे. हे फडणवीस यांचे अपयश दाखविते, असे सावंत म्हणाले.
हेही वाचा >>> काँग्रेसचे ६ ते ३१ मार्चदरम्यान राज्यव्यापी आंदोलन; १३ मार्चला ‘चलो राजभवन’; रायपूर अधिवेशनात निर्णय
नाना पटोले म्हणजे काँग्रेस नाहीत महाविकास आघाडीबाबत आताच सर्व काही ठरणार नाही. मात्र, महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचे प्रयत्न नक्कीच सुरू राहतील. आघाडीबाबत काँग्रेसचा निर्णय प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेच ठरवतील, असे नाही. सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, बाळासाहेब थोरात आणि पक्षाचे इतर नेते आहेत. त्यांची कोअर कमिटी चर्चेनंतर याबाबतचा निर्णय घेईल. स्वबळाचा निर्णय पटोले यांचा स्वत:चा असू शकतो, पण एकटे नाना पटोले म्हणजे संपूर्ण काँग्रेस नाही, असेही सावंत यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला विदर्भ संपर्क प्रमुख सुरेश साखरे, निलेश धुमाळ, गोंदिया जिल्हा प्रमुख पंकज यादव, आदी उपस्थित होते.