चंद्रपूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत माझ्या पराभवाला भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तर माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या पराभवाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार जबाबदार आहे, असा थेट आरोप ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकात खैरे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
हेही वाचा >>> सावधान! ‘लिंक’वर ‘क्लिक’ करताच ३ लाख लंपास, केवायसीसह पॅनकार्ड जोडणीच्या नावावर सायबर गुन्हेगार सक्रिय
शिवगर्जना यात्रेनिमित्ताने ते चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. स्थानिक विश्राम गृहात पत्रकारांशी संवाद साधला. विशेष म्हणजे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्याशी त्यांची भेट झाली. या भेटीनंतर खैरे यांनी थेट मुनगंटीवार यांच्यावर आरोप करीत अहीरांचा पराभव मुनगंटीवार यांच्यामुळे झाला असे म्हटले. याचा ठोस पुरावा नाही. मात्र, ही सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे, असेही खैर म्हणाले. राज्यात भाजपने पैशाच्या बळावर फोडाफोडीचे राजकारण सुरु केले आहे. यांचे गंभीर परिणाम भविष्यात भाजपला भोगावे लागतील. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने मराठी माणसाला न्याय देण्याचे काम केले. बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा भाजपने अंग झटकले. तेंव्हा त्याची जबाबदारी बाळासाहेबांनी घेतली. त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. भाजपचे हिंदुत्व बेगडी आहे.
हेही वाचा >>> दहावी परीक्षेच्या भीतीने ‘तो’ रेल्वेगाडीत बसला अन..
अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात अप्रतिम काम झाले. मात्र, त्यांच्या सहकाऱ्यांनी धोका दिला. प्रचंड खोक्यांचा वापर पक्षफुटीसाठी झाला आहे. लोकांच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष जावू नये, यासाठी जाणीवपूर्वक वाद निर्माण केले जातात, असे खैरे म्हणाले. हा सगळा प्रकार राज्य शासन पुरस्कृत आहे. यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे. एखाद्या पक्ष फोडण्याचे नीच काम फडणवीस यांनी केले आहे. या मिंधे सरकाराचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी ही शिवगर्जना यात्रा आहे. याला लोकांचा आणि शिवसैनिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असा दावा खैरे यांनी केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, संपर्क प्रमुख प्रशांत कदम, युवा सेनेचे शरद कोळी, शिल्पा बोडखे उपस्थित होत्या.