अकोला : वाढत्या तापमानासोबतच अकोलेकरांवर जलसंकट देखील कोसळले आहे. शहरातील विविध भागात अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने गुरुवारी अकोला महापालिकेवर घागर मोर्चा काढला. शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कक्षात तोडफोड केली. कार्यालयातील खुर्च्यां फेकल्या. आंदोलकांनी घागरी फोडत ‘पाणी द्या, पाणी द्या’ अशी नारेबाजी केली.
अकोला महापालिकेकडून १६ एप्रिलपासून पाणी कपात केली आहे. चार दिवसाआड म्हणजेच पाचव्या दिवशी पाणी पुरवठा सुरू झाला. दरम्यान, शहरातील मलकापूर भागात १० दिवसांआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेकांना पाणी विकत घ्यावे लागते. मलकापूर भागात भीषण पाणी टंचाईचे चटके बसत आहेत. या विरोधात आज संतप्त मलकापूर येथील नागरिकांसह ठाकरे गटाने महापालिकेवर घागर मोर्चा काढला. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वात हा घागर मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेच्या स्थानिक महिलांना सोबत घेत घागर डोक्यावर घेत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात धडक दिली होती. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अमोल डोईफोडे यांच्या कक्षात आंदोलनकर्ते दाखल झाले. ते कक्षात हजार नव्हते. त्यामुळ ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला. कक्षातील खुर्च्यांसह इतर साहित्यांची तोडफोड करण्यात आली. महिलांनी सोबत आणलेले घागर देखील कार्यालयात फोडले. ठाकरे गटाच्या आक्रमक आंदोलनामुळे महापालिकेत एकच धावपळ उडाली. या आंदोलनाची माहिती मिळतात शहर कोतवाली पोलीस महापालिकेत दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांसह मलकापूर भागातील नागरिकांनी महापालिका परिसरात घागर फोडत जोरदार नारेबाजी देखील केली.
उन्हासोबतच पाणीटंचाईचे देखील चटके.
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या उन्हाळ्यात देखील अकोल्यात उन्हाचा पारा प्रचंड चढला आहे. वाढत्या तापमानासोबतच अकोल्यातील नागरिकांसमोर पाण्याचे संकट निर्माण झाले. एकीकडे तापमान प्रचंड वाढत असतांनाच दुसरीकडे जिल्ह्यातील जलसाठ्यामध्ये झपाट्याने घट होत असल्याचे दिसून येते. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान प्रकल्पातील पाणी साठ्यातून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले. महापालिकेने पाणी कपात जाहीर केली. पाच दिवसांनी शहरात पाणी पुरवठा होत असल्याने अकोलेकरांना तप्त उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.