यवतमाळ : दारव्हा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारार्थ शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आयोजित सभेचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी वणी येथे हेलिपॅडवर उतरताच उद्धव ठाकरे यांची बॅग निवडणूक विभागाच्या तपासणी पथकाने तपासली. तोच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर तोफ डागली. भाजप आणि शिंदे यांनी शिवसेना पक्ष चोरला. केंद्र सरकारच्या दबावात या प्रकरणाच्या निकालासाठी तारखेवर तारीख दिली जात आहे, असे ठाकरे म्हणाले.
निवडणूक आयोगानेही आपल्या मर्यादा सांभाळायला हव्या, असे सांगत ठाकरे यांनी शिवसेना हे नाव आपल्या आजोबांनी व वडिलांनी दिले आहे. गद्दारांना हे नाव घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असे ते म्हणाले. भाजप हिंदुत्वावरून आमच्यावर टीका करते, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व हे आमचे आहे, असे ठाकरे म्हणाले. मोदी विश्वगुरू असले तरी जेथे जाईल तेथे माझे नाव घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. यावरून त्यांनी शिवसेनेचा किती धसका घेतला, हे लक्षात येते, असे ठाकरे म्हणाले. लाडकी बहीण या योजनेच्या यशावर राज्य सरकार आपली पोळी भाजत आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेत दरमहा तीन हजार रूपये निधी, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, पिकाला हमीभाव देवू, असे ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा…गोंदियात प्रचाराची पातळी खालावली, एक म्हणतो कंत्राटदार, दुसरा म्हणतो भूमिपूजनदास
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी देशाला दिशा देणारा महाराष्ट्र दिशाहीन करून ठेवला आहे. महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी ही विधानसभा निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे. जनतेने विचारपूर्वक मतदान न केल्यास भाजप, शिंदे महाराष्ट्र गुजरातमध्ये नेवून ठेवतील, अशी टीका शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
‘पवन’ला वाऱ्यावर सोडणार नाही
दिग्रस मतदारसंघात शिवसेना उबाठाने पवन जयस्वाल यांना उमदेवारी दिली. मात्र, माणिकराव ठाकरे यांच्यासाठी जयस्वाल यांची उमेदवारी रद्द केली. आजच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी माणिकराव ठाकरे आणि पवन जयस्वाल यांना समोरासमोर उभे करून, आपण माणिकराव ठाकरेंची जबाबदारी घेतली. मात्र, पवनला वाऱ्यावर सोडणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी दिग्रसचे नगराध्यक्ष विजय बंग यांनी शिवसेना उबाठात प्रवेश केला. खा. संजय देशमुख, माणिकराव ठाकरे यांचीही यावेळी भाषणे झाली.