लोकसत्ता टीम
यवतमाळ : जिल्ह्यात थॅलेसेमिया, सिकलसेलचे १५ हजार रुग्ण आहे. या रुग्णांना शासकीय रुग्णालयात योग्य उपचार व सुविधा मिळत नसून, औषधांचाही तुटवडा आहे. त्यामुळे गत दीड महिन्यांत पाच रुग्णांना प्राण गमवावे लागले. या रूग्णांसाठी डे-केअर युनिट, औषधोपचाराची त्वरित व्यवस्था करावी अशी मागणी थॅलेसेमिया, सिकलसेल संघटनेचे अध्यक्ष शुभम बजाईत यांनी केली.
विश्रामभवनात आयोजित पत्रकार परिषदत ते बोलत होते. यावेळी प्रवीण तुरी, अतुल झिलपे आदी उपस्थित होते. २०२१ च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ५७६ थॅलेसेमिया, पाच हजार २०० सिकलसेल रुग्णांची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात या दोन्ही आजारांचे १५ हजार रुग्ण असून, एकट्या यवतमाळची संख्या सहा हजार इतकी आहे. शासकी वैद्यकीय महाविद्यालयात या रूग्णांसाठी डे-केअर युनिट, औषधोपचाराची सुविधा नाही. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. परिणामी हे रूग्ण वेदनेने त्रस्त होवून मरणाच्या दारात उभे आहेत. गत महिन्यात तिघांचा तर अलिकडेच दोघांचा मृत्यू झाल्याचा दावा यावेळी थॅलेसिमिया सिकलसेल संघटनेने केला.
आणखी वाचा-नागपूर : आंदोलक आक्रमक! विधान भवनात स्वतंत्र विदर्भाचा झेंडा…
दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत असताना शासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. बहुतांश रूग्ण आर्थिक, सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत. त्यामुळे त्यांना खासगी दवाखान्यात महागडा उपचार घेणे अशक्य आहे. जिल्हा रूग्णालयात सोयीसुविधा, औषधसाठा, याबाबत विचारणा केली तर उडवाउडवीची उत्तरे देण्यात येते. यापूर्वी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार आदींना निवेदने देण्यात आली. परंतु, कोणीही दखल घेतली नाही.
येथील जिल्हा रुग्णालयात औषधसाठा नसल्याने त्यांना नागपूर, अमरावती येथे खासगी रुग्णालयात उपचारसाठी जावे लागते. तेथील वार्षिक १५ हजारांचा खर्च न परवडणारा आहे. शासनाने या रूग्णांना स्वतंत्र वॉर्ड, औषधसाठा व सुविधा उपलब्ध करून न दिल्यास सर्व रुग्ण व त्यांचे कुटुंब आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकेल, असा इशारा शुभम बजाईत यांनी यावेळी दिला.
आणखी वाचा-चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
नियुक्ती पत्र देण्यास टाळाटाळ
नेर येथील एका सिकलसेलग्रस्त तरूणीला या आजारामुळे तलाठी पदाच्या नियुक्तीपासून वंचित ठेवल्याचा आरोप बजाईत यांनी केला आहे. ही तरूणी या आजाराचा सामना करत अभ्यास करून तलाठी पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली, मात्र आता या आजारामुळे तिला नियुक्ती देण्यात येत नसल्याचे शुभम बाजाईत यांनी सांगितले. या बाबीची चौकशी करून न्याय देण्याची मागणी संघटनेने केली आहे.