लोकसत्ता टीम
वर्धा: एकशे दोन वर्षे जुन्या सामान्य रुग्णालयाची इमारत धोकादायक स्थितीत आहे. डॉक्टर व कर्मचारी जीव मुठीत घेवून सेवा देत आहेत, तर रुग्णांचाही जीव धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बाह्य विभागाची इमारत कामापुरती बांधण्यात आली. पण जुना मोठा परिसर ‘जैसे थे’च असल्याने छताच्या खपल्या पडण्याची बाब नित्याचीच झाली आहे. जुन्या अतिदक्षता विभागाची वास्तू अतीजीर्ण झाल्याने काही विभाग अन्यत्र हलविण्यात आले. त्यामुळे एकाच वास्तूत चालणारा सर्व कारभार अनागोंदी निर्माण करीत असल्याचे डॉक्टर सांगतात. नव्या वास्तूचा प्रस्ताव तयार करण्यात आला, पण तो धूळ खात पडला आहे.
याबाबत विचारणा केली असता आमदार डॉ. पंकज भोयर म्हणाले की, जुनी वास्तू अत्यंत धोकादायक झाल्याची बाब खरी आहे. प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पण मंजूर न झाल्याने या अनुषंगाने आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांना भेटून ही स्थिती नमूद केली. नव्या बांधकामासाठी त्याच परिसरात जागा उपलब्ध असल्याचेही निदर्शनास आणल्याचे आ. भोयर यांनी सांगितले.