खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणेच महापालिका शाळांमधील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले होते. मात्र या १८०० टॅबपैकी ४०० टॅब खराब झाले तर काही गहाळ झाले. त्यामुळे या टॅब खरेदीची आता चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, आधीच आर्थिक संकटात असलेल्या महापालिका प्रशासनाला पुन्हा टॅब खरेदी करावी लागणार आहे.

करोनामुळे शाळा, कॉलेजांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनाही ही सुविधा मिळावी यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने सुमारे २८ शाळेतील १८०० विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले होते. दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर हे टॅब शाळेच्या माध्यमातून महापालिकेच्या शिक्षण विभागाला परत करणे आवश्यक होते. मात्र गेल्यावर्षी देण्यात आलेल्या १८०० पैकी केवळ ३०० टॅब परत आले असून ४०० टॅब खराब झाले आहेत. ज्यांना टॅब देण्यात आले होते त्यातील अनेकांनी ते शाळेत परत केले नाही. त्यामुळे शिक्षण विभागासमोरील अडचणी वाढल्या आहेत. ज्या कंपनीला टॅब खरेदीचे कंत्राट देण्यात आले होते त्या कंपनीला याबाबत विचारणा केली जाणार असून तसे पत्र महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० टॅब गहाळ झाले तर ५२ टॅब तुटले आहेत. गेल्यावर्षी विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले मात्र परीक्षेच्या काळापर्यंत आवश्यक असलेले सिमकार्ड व इंटरनेट कनेक्शनचा पत्ता नव्हता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात या टॅबचा उपयोग करताच आला नाही.

यासंदर्भात महापालिकेच्या शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, गेल्यावर्षी देण्यात आलेले बहुतांश टॅब विद्यार्थ्यांकडून परत आले आहे. यावर्षी सुद्धा शाळेत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार आहे.