नागपूर : राज्यातील विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. नाशिकमध्ये गुरुवारी घेण्यात आलेल्या तलाठी ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी – म्हसरुळ परिसरातील केंद्राबाहेरून एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन, टॅब आणि हेडफोन जप्त करण्यात आले आहेत. गणेश श्यामसिंग गुसिंगे असे आरोपीचे नाव असून तो पिंपरी चिंचवड पोलीस भरती आणि म्हाडा भरतीमधील फरार आरोपी आहे.
पोलीस फरार आरोपीला पकडण्यात अपयशी ठरल्याने हा गैरप्रकार घडत आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने सरकारवर ताशेरे ओढले आहेत. आज राज्यातल्या विविध ठिकाणी तलाठी भरतीसाठी परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. नाशिकमधील म्हसरूळ या ठिकाणी या परीक्षेमध्ये गैरप्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. एका मोबाईलमध्ये काही संगणकावरील प्रश्नपत्रिकेचे फोटोही आढळल्याने खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – अमरावती : चुलत सासऱ्याची सुनेवर होती वाईट नजर; एक दिवस घरी कोणी नसताना..
या प्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी गणेश श्यामसिंग गुसिंगेला अटक केली असून यामागे एखादे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संशयिताचे कोणी साथीदार आहेत का याचाही तपास सुरू आहे.
हेही वाचा – स्पा आणि मसाजच्या नावावर सेक्स रॅकेट; कोलकाता, मुंबई- दिल्लीतील ६ मुलींची सुटका
गणेश शामसिंग गुसिंगे हा एक अट्टल पेपर फोड्या आहे. याची एक टोळी आहे. हा स्वतः पिंपरी चिंचवड पोलीस भरतीमधील फरार आरोपी आहे. तसेच म्हाडा पेपर फुटीमधीलसुद्धा हा फरार आरोपी आहे. तसेच आता झालेल्या वन विभागाच्या भरतीमध्ये हा हायटेक साहित्य वापरून चांगले गुण घेणार आहे. त्यामुळे ही टोळी पकडणे आवश्यक आहे. सरकारने कठोर पावले न उचलल्यास आम्हाला आंदोलन करावे लागेल, असे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने म्हटले आहे.