नागपूर: जेवणाचा डबा तयार करण्यासाठी विवाहित महिलेला घरी नेऊन युवकाने बलात्कार केला. महिलेचे नग्न छायाचित्र काढून जवळपास एक लाख रुपये उकळले. छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देत आणखी ६० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यामुळे युवकाने तिचे छायाचित्र नातेवाईकांना पाठवले. या प्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. मिहीर विश्वनाथ साना (गडचिरोली) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित ३८ वर्षीय महिला आपल्या जाऊबाईच्या बाळावर उपचार घेण्यासाठी नागपुरात आली होती. मिहीर हा सध्या अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विश्वकर्मा नगर येथे राहतो. महिलेची मिहीर सोबत भेट झाली. १२ एप्रिलला जेवणाचा डबा करण्यासाठी मिहीर महिलेला घरी घेऊन गेला. त्याने तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. तिचे काही नग्न छायाचित्र काढले.
हेही वाचा… मद्यविक्रेते प्रथमच रस्त्यावर! विदर्भातील ‘परमिटरूम’ आज बंद…
गेल्या तीन महिन्यांपासून मिहिर त्या महिलेला पैशाची मागणी करीत होता. महिलेने आतापर्यंत त्याला एक लाख रुपये दिले. तरीही तो आणखी ६० हजार रुपये मागत होता. पैसे न दिल्यास छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देत होता. त्याने काही छायाचित्र महिलेच्या ननंदेला आणि अन्य नातेवाईकांना पाठवले. तसेच अनेकदा शारीरिक संबंध ठेवण्यास बाध्य केले. वारंवार लैंगिक अत्याचाराला कंटाळेल्या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुन्हा दखल करून आरोपीचा शोध सुरू केला.