नागपूर: नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातू (मेयो) पसार होण्यासाठी आरोपीने एका पोलीस कर्मचाऱ्याचा गळा दाबला तर दुसऱ्याला गुप्तांगावर लात मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुस्ताक उर्फ मुन्ना पटेल वल्द अहमद पटेल (४८) रा. प्रधानमंत्री आवास योजना, संघर्षनगर, यशोधरानगर, नागपूर असे आरोपीचे नाव आहे. तहसील पोलिसांच्या माहितीनुसार, या आरोपीवर सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो पोलीस कोठडीत होता. १३ मार्चला पोलीस कोठडीची तारीख संपत असल्याने त्याला वैद्यकीय तपासणीसाठी मोहनसिंग ठाकूर आणि त्यांचे सहकारी मेयो रुग्णालयात घेऊन गेले. येथे आरोपीने वरिष्ठांकडेच तपासणीचा आग्रह धरला. शिविगाळही सुरू केली. मोहनसिंग ठाकूर आरोपीची समज काढत असतानाच त्याने धक्का मारत पळण्याचा प्रयत्न केला. इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला पोलीस बुथमध्ये आणले. येथेही आरोपीने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला चावा घेतला व त्याच्या गुप्तांगावर लात मारली. मोहनसिंग ठाकूर यांना तर गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांनी आरोपीला मागे ओढल्याने अनुचित घटना टळली. या प्रकरणात ठाकूर यांच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा >>>गडकरींना वाटते त्यांची ‘ही’ कामे नागपूरमध्ये ‘गेमचेंजर’ ठरतील
भिंतीवर डोके आपटले
आरोपीने रागाच्या भरात स्वत:चे डोके भिंतीवर आपटून जखमी केले व पोलिसांनीच मारहाण केल्याचा आव आणत या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.